नवनीत राणांना मोठा दिलासा, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती, राणा काय म्हणाल्या?

| Updated on: Jun 22, 2021 | 9:19 PM

सर्वोच्च न्यायालयानं दिलासा दिल्यानंतर नवनीत राणा यांनी समाधान व्यक्त केलंय. तसंच मी राजकारणात आले म्हणून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोपही केला आहे.

नवनीत राणांना मोठा दिलासा, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती, राणा काय म्हणाल्या?
नवनीत राणा, खासदार, अमरावती
Follow us on

अमरावती : युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्या आणि अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांचं जात प्रमाणपत्र हायकोर्टाने रद्द केल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. राणा यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने आज नवनीत राणा यांना मोठा दिलासा दिला आहे. राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयानं प्रतिवाद्यांना नोटीस बजावल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयानं दिलासा दिल्यानंतर नवनीत राणा यांनी समाधान व्यक्त केलंय. तसंच मी राजकारणात आले म्हणून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोपही केला आहे. (Supreme Court grants relief to MP Navneet Rana in caste certificate case)

2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा नवनीत राणा यांनी पराभव केला होता. मात्र, अडसूळ यांना पराभव पचवता आला नाही, अशी टीका नवनीत राणा यांनी केलीय. लोकसभेत सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रश्न उपस्थित करते. महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करते. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असल्यामुळे असे प्रकार केले जात आहे. मी राजकारणात आल्यामुळे माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र, मी 200 वर्षे जुने दस्तावेज घेऊन सर्वोच्च न्यायालयात गेले, अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करत खासदार नवनीत राणा यांना दिलासा दिला आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने प्रतिवाद्यांना नोटीस बजावल्या आहेत. न्यायमूर्ती विनीत शरण आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठाने 8 जून रोजीच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली. तसंच सर्व प्रतिवाद्यांना नोटीस बजावत 4 आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 जून रोजी होणार आहे.

कोण आहेत नवनीत राणा?

नवनीत राणा यांचा जन्म 3 जानेवारी 1986 रोजी मुंबईत झाला. त्यांनी तेलुगू, पंजाबी, हिंदी आणि मल्याळम चित्रपटसृष्टीत काम केले आहे. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी नवनीत राणा या मॉडेलिंग करायच्या. मात्र, 2011 साली रवी राणा यांच्याशी लग्न झाल्यानंतर नवनीत राणा यांनी चित्रपटसृष्टीपासून फारकत घेतली होती. नवनीत राणा यांचा विवाहसोहळाही चर्चेचा विषय ठरला होता. 3100 जोडप्यांसह त्यांनी सामूहिक विवाहसोहळ्यात नवनीत राणा यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. या विवाहसोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित होत्या.

नवनीत राणा राजकारणात कशा आल्या?

नवनीत राणा यांचे लग्न झाले तेव्हा रवी राणा हे अमरावतीच्या बाडनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. 2014 साली नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्य तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी चारवेळा खासदारकीची टर्म भूषविलेले शिवसेनेचे हेविवेट नेते आनंदराव अडसूळ यांच्याशी दोन हात केले. मात्र, या निवडणुकीत नवनीत राणा पराभूत झाल्या.

मात्र, 2019 च्या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढताना नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांचा 36000 मतांनी पराभव केला. 2019 मध्ये लोकसभेत निवडून गेलेल्या त्या महाराष्ट्रातील एकमेव कलाकार होत्या.

संबंधित बातम्या :

खासदार नवनीत राणा यांना धक्का, जात प्रमाणपत्र कोर्टाकडून रद्द

Navneet Rana: कोण आहेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा म्हणणाऱ्या खासदार नवनीत राणा?

Supreme Court grants relief to MP Navneet Rana in caste certificate case