मुंबई: महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर आता नवं सरकार स्थापन करण्यासाठी 6 महिन्यांपर्यंतचा अवकाश आहे. भाजप आणि शिवसेनेचं बिनसल्यामुळे महाराष्ट्रात सरकार (Nawab Malik on Maharashtra CM) स्थापन होऊ शकलेलं नाही. भाजपने शब्द फिरवल्याचा आरोप करत शिवसेनेने त्यांच्याशी फारकत घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी (Nawab Malik on Maharashtra CM) संधान साधलं. महासेनाआघाडीच्या चर्चा आणि बैठका युद्धपातळीवर सुरु आहेत.
कोणाला किती आणि कोणती मंत्रिपदं मिळणार, तसंच किमान समान कार्यक्रम काय यावर वाटाघाटी सुरु आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्रिपदावर मोठं भाष्य केलं आहे. मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे असेल असं नवाब मलिक यांनी सांगितलं. ते टीव्ही 9 शी बोलत होते.
महासेनाआघाडीत मुख्यमंत्रिपद कोणाकडे असेल, असं नवाब मलिक यांना विचारण्यात आलं., त्यावर नवाब मलिक म्हणाले, “मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरच शिवसेना वेगळी झाली आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान राखणं आणि त्यांचा स्वाभिमान जिवंत ठेवणं ही आमची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल. उपमुख्यमंत्रिपदाबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. काँग्रेसला सत्तेत यायचंच नाही, तर मागण्या कुठून समोर यायला लागल्या? मला नाही वाटत. त्यांना तर बाहेरुन पाठिंबा द्यायचा आहे, आमची इच्छा आहे की त्यांनी सत्तेत यावं. पद, खाती याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. येत्या दिवसात कोणताही वाद होणार नाही. आम्ही सगळे एकत्र बसून चर्चा करु”
TV9 भारतवर्ष से NCP के वरिष्ठ नेता @nawabmalikncp ने कहा- सरकार बनाना है तो कांग्रेस-NCP और शिवसेना साथ आए, ये सच्चाई है. कांग्रेस बाहर से समर्थन देना चाहती है, पवार साहब चाहते हैं सभी दल सरकार में शामिल हो. सरकार बनाना ही प्राथमिकता नहीं, 5 साल चलाना भी है. ( @thakur_shivangi ) pic.twitter.com/5oBvV2ldCo
— TV9 भारतवर्ष (@TV9Bharatvarsh) November 14, 2019
पर्यायी सरकारशिवाय पर्याय नाही
पर्यायी सरकार निर्माण करणे ही आमची जबाबदारी आहे. तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय महाराष्ट्रात सरकार स्थापन होऊ शकणार नाही. शरद पवार मुंबईत आहेत, ते दिल्लीला जाणार नाहीत. काँग्रेसचा निर्णय आल्यानंतर आम्ही आमचा निर्णय जाहीर करु, असं नवाब मलिक तीन दिवसापूर्वी म्हणाले होते.
समन्वयासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची समिती
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या शिफारशीनंतर महाराष्ट्रात अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. मात्र भाजप वगळता उर्वरीत तीन पक्ष आता एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत (Uddhav Thackeray meeting with congress) जाऊन सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray meeting with congress) यांनी स्वत: त्याबाबत काल पुन्हा एकदा जाहीर केलं. आता तीनही पक्ष किमान सामायिक कार्यक्रम धोरण आखत असून, एकमेकांशी चर्चेच्या वाटाघाटी सुरु आहेत.
किमान समान कार्यक्रमासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची 5-5 जणांची समिती तयार करण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, अजितदादा पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, नवाब मलिक यांची नावं, तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टावार, माणिकराव ठाकरे समितीत असण्याची शक्यता आहे. यामध्ये शिवसेनेची नावं समाविष्ट होतील.
अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद?
दरम्यान, राष्ट्रवादीने शिवसेनेसमोर मुख्यमंत्रिपदासाठी प्रस्ताव ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री असेल, असं सांगण्यात येत आहे. त्याबाबत अद्याप अधिकृत माहिती कोणीही दिलेली नाही. राष्ट्रवादीच्या प्रस्तावानुसार मुख्यमंत्रिपद हे अडीच-अडीच वर्षांसाठी असेल. पहिली अडीच वर्षे शिवसेनेचा तर दुसरी अडीच वर्षे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असेल. उपमुख्यमंत्रिपद पाचही वर्षे काँग्रेसकडे राहील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रस्तावावर (NCP proposal to Shivsena for Government Formation) काय प्रतिसाद देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
काँग्रेस शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी बाहेरुन पाठिंबा देण्याची शक्यताही वर्तवली जात होती. मात्र, काँग्रेसच्या बाहेरुन पाठिंब्याच्या भूमिकेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस प्रतिकूल असल्याचं सांगितलं आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसला सरकारमध्ये सहभागी होण्याचा आग्रह धरला आहे. शिवाय राष्ट्रपती राजवट लागल्यामुळे काँग्रेसला आता बाहेरुन पाठिंबा देता येणार नाही. त्यांना थेट सत्तेत सहभागीच व्हावे लागेल.
विशेष म्हणजे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे शिवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागणार आहे. अन्यथा राज्यात मध्यावधी निवडणुकांचीही नामुष्की येऊ शकते. असं झाल्यास या सर्वच पक्षांचे सत्तास्थापनेचं नियोजन बिघडणार आहे. त्यामुळेच या पक्षांचाही प्रयत्न लवकरात लवकर सत्तास्थापनेची बोलणी पूर्ण करण्याचा असणार आहे.
संबंधित बातम्या
पहिली अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री, मग राष्ट्रवादीचा, 5 वर्ष काँग्रेसचा उपमुख्यमंत्री?
मुख्यमंत्रिपदाबाबत बोलणार नाही, मात्र भाजपचा आमचं जुळू नये यासाठी प्रयत्न : पृथ्वीराज चव्हाण