Nawab Malik ED Property Seized : नवाब मलिकांना ईडीचा आणखी एक झटका, उस्मानाबाद, मुंबईतली प्रॉपर्टी जप्त
मंत्री नवाब मलिक यांना पुन्हा मोठा दणका दिलाय. आधी जमीन खरेदी प्रकरणात ईडीने अटक केली आणि आता नवाब मलिकांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
मुंबई : मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना पुन्हा मोठा दणका दिलाय. आधी जमीन खरेदी प्रकरणात ईडीने (Ed) अटक केली आणि आता नवाब मलिकांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची संपत्ती ईडीने जप्त केल्याने (Property Seized) पुन्हा राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. कुर्ला येथील गोवावाला कंपाऊंड आणि वांद्रे येथील ही संपत्ती जप्त केली आहे. मलिक यांच्या एकूण आठ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मलिक यांना अटक करण्यात आली असून त्यांना न्याायलयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. ईडीने जप्त केलेल्या संपत्तीचा आकडाही खूप मोठा आहे. हा आकडा कोट्यवधींच्या घरात गेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नवाब मलिकांच्या अटकेवरून राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप सुरू होते. ही अटक केवळ दबाव आणण्यासाठी आहे, असा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत होता.
कोणती संपत्ती जप्त?
- कुर्ल्यातील गोवावाला कंम्पाऊंड जप्त
- कुर्ला पश्चिमेतील व्यावसायिक जागा ईडीकडून जप्त
- उस्मानाबादमधील मलिकांची 148 एकर जमीन जप्त
- कुर्ला पश्चिमेतील 3 फ्लॅट्स जप्त ,
- वांद्रे पश्चिमेतील 2 राहती घरंही ईडीकडून जप्त
ई़डीकडून आलेली अधिकृत माहिती
ED ने NIA द्वारे IPC च्या कलम 120 B आणि UAPA च्या कलम 17, 18, 20, 21 ,38 आणि 40 अंतर्गत नोंदवलेल्या FIR च्या आधारे दाऊद इब्राहिम आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा तपास सुरू केला. दाखल केलेल्या एफआयआरमध्ये दाऊद इब्राहिम कासकर, दाऊद भाई, हाजी अनीस, अनीस इब्राहिम शेख, शकील शेख, छोटा शकील, जावेद पटेल, जावेद चिकना, इब्राहिम मुश्ताक अब्दुल रज्जाक मेमन, टायगर मेमन यांची नावे आहेत. एफआयआरमध्ये असेही म्हटले आहे की दाऊद इब्राहिमने भारत सोडल्यानंतर, हसीना पारकर उर्फ हसिना आपा आणि इतरांसारख्या त्याच्या जवळच्या साथीदारांद्वारे भारतात त्याच्या गुन्हेगारी कारवाया नियंत्रित करण्यास सुरुवात केली, अशी माहिती ईडीद्वारे देण्यात आली आहे.
खोटी कागदपत्रं बनवल्याचा ठपका
ईडीने केलेल्या तपासात असे उघड झाले आहे की अशाच एका प्रकरणात श्रीमती मुनिरा प्लंबरची प्रमुख मालमत्ता नवाब मलिक यांनी मेसर्स सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून हडप केली होती. नवाब मलिकच्या कुटुंबीयांच्या मालकीची आणि नवाब मलिकच्या नियंत्रणाखाली असलेली कंपनी, हसीना पारकरसह डी-गँगच्या सक्रिय संगनमताने ही मालमत्ता हडपण्यासाठी, हसीना पारकर आणि नवाब मलिक यांनी मिळून या गुन्हेगारी कृत्याला प्रामाणिकपणा दाखवण्यासाठी अनेक कागदपत्रे तयार केली, असा ठपका ठेवण्यात आला आहे.
दुसरा मोठा दणका
याच गुन्ह्याचा तपास करताना नवाब मलिक यांचे जमीन खरेदी प्रकरण समोर आले आहे. त्यात काही दिवसांपूर्वीच मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता नवाब मलिक यांची कोट्यवधींची संपत्ती जप्त करत हा दुसरा मोठा दणका दिला आहे. यावरून आता पुन्हा राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू होण्याची शक्यता आहे.
‘मुस्लिमांना शांततेत आणि सन्मानाने जगू द्या’, कर्नाटक भाजपमधून मुस्लिमांप्रती प्रेम आलं उफाळून