बारामती लोकसभेचं गणित काय, पक्षीय बलाबल आणि आकडे कुणाच्या बाजूने?

| Updated on: Jan 01, 2024 | 9:39 PM

अजित पवार होते म्हणून सुप्रिया सुळे ३ टर्म खासदार झाल्या, असं म्हणत सुप्रिया सुळेंना अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर यांनी आव्हान दिलंय. बारामती लोकसभेचं गणित काय आहे, 2019 चा निकाल काय सांगतो, सध्यस्थिती लोकसभेचं बलाबल काय आहे, आणि आकडे कुणाच्या बाजूनं आहेत? याबाबत माहिती सांगणारा 'टीव्ही 9 मराठी'चा स्पेशल रिपोर्ट!

बारामती लोकसभेचं गणित काय, पक्षीय बलाबल आणि आकडे कुणाच्या बाजूने?
Follow us on

पुणे | 1 जानेवारी 2024 : “निवडणूक होईपर्यंत पुणे सोडणार नाही”, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटल्यानंतर आतापर्यंत तुम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळेच जिंकत आलात, असा दावा अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर यांनी केलाय. त्यांनी अप्रत्यक्षपणे यंदा बारामतीत सुप्रिया सुळेंचा पराभव होण्याचं भाकीत वर्तवलंय. हा सारा वाद शिरुरमध्ये खासदार अमोल कोल्हे यांना पराभूत करणारच, या अजित पवारांच्या आव्हानापासून सुरु झालाय. यावरुन अजित पवारांना त्यांच्या मुलाला का जिंकवता आलं नाही? अशी टीका झाली. त्यावरुनच सुप्रिया सुळे गेली 15 वर्ष अजित पवारांमुळेच जिंकल्याचं विधान रुपाली चाकणकरांनी केलंय.

पुणे जिल्ह्यात विधानसभेच्या 20 जागा आहेत. 2019 ला पुणे ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीचं वर्चस्व होतं, तर शहरात भाजपचं. राष्ट्रवादी आणि भाजप दोघांनी 9-9 जागा जिंकल्या आणि काँग्रेसनं दोन. बारामती लोकसभेत ज्या 6 विधानसभा येतात, त्यात दौंड, खडकवासला, भोर, पुरंदर, इंदापूर आणि बारामती यांचा समावेश आहे. सध्या दौंड आणि खडकवासल्यात भाजपचे आमदार आहेत. भोर आणि पुरंदरमध्ये काँग्रेसचे तर इंदापूर आणि बारामतीत अजित पवार गटाचे आमदार आहेत.

2019 च्या लोकसभेत राष्ट्रवादीच्या सुळेंविरोधात भाजपच्या कांचन कूल लढल्या. सुळेंना 6 लाख 86 हजार 714 मतं मिळाली. तर भाजपच्या कांचन कूल 1 लाख 55 हजारांहून अधिकच्या मतांनी पराभूत झाल्या. आता बारामती लोकसभेत विधानसभानिहाय कुणाला किती लीड होता? ते देखील जाणून घेऊयात.

बारामती लोकसभेतली गेल्या निवडणुकीतील विधानसभानिहाय आकडेवारी

दौंडमध्ये भाजपच्या कांचन यांना 91 हजार 171 मतं मिळाली. तर सुळेंना 84 हजार 118 मते मिळाली. सुळे इथं 7053 मतांनी पिछाडीवर राहिल्या. खडकवासला – भाजपला 1 लाख 52 हजार 487 तर सुळेंना 86 हजार 993 मतं मिळाली, इथं सुळेंना प्रतिस्पर्धेच्या तुलनेत 65 हजार मतं कमी होती. भोरमध्ये कांचन यांना 90 हजार 159, सुळेंना 1 लाख 9 हजार 163, सुळेंना 19 हजारांचं लीड होतं.

पुरंदरमध्ये कांचन यांना 95 हजार 191, तर सुळेंना 1 लाख 4 हजार 872 मतं मिळाली, सुळेंना 9 हजार 600 मतांचं लीड मिळालं. इंदापुरात कांचन यांना 52 हजार 635 तर सुळेंना 1 लाख 23 हजार 573 मतं मिळाली, सुळेंनी 70 हजारांचं लीड घेतलं. बारामतीत कांचन यांना 47 हजार 68 मतं गेली, तर सुळेंनी 1 लाख 74 हजार 986 मतं घेतली, बारामतीत सुळेंनी 1 लाख 27 हजारांचं लीड घेतलं. थोडक्यात खडकवासल्यात सुळे 65 हजारांनी पिछाडीवर राहिल्या. तर बारामती आणि इंदापुरात सुळेंना सर्वाधिक लीड मिळालं. दरम्यान खडकवासला विधानसभेत यंदा नाना पाटेकर देखील निवडणूक लढवण्याची चर्चा आहे. त्यावरुन रुपाली चाकणकरांनी अप्रत्यक्षपणे अभिनेत्यांना फारसं स्वीकारलं गेलेलं नाही, असं म्हटलंय.