दसरा मेळाव्याआधी अजित पवार यांचा ठाकरे-शिंदेंना मोलाचा सल्ला, म्हणाले…
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सबुरीचा सल्ला दिलाय. आज दसरा मेळावा होतोय. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांना विचारलं असता त्यांनी हे उत्तर दिलंय.
रणजीत जाधव, प्रतिनिधी, TV9 मराठी, पिंपरी-चिंचवड: विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना सबुरीचा सल्ला दिलाय. ठाकरे-शिंदेंनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, कटुता निर्माण होईल असं कोणतंही कृत्य करू नये, असं अजित पवार म्हणाले आहेत. आज दसरा मेळावा होतोय. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांना विचारलं असता त्यांनी हे उत्तर दिलंय.
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनी ही सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी. जरूर त्यांनी स्वतःची ताकद दाखवावी. पक्ष वाढविण्याचं काम करावं. त्यांची भूमिका जनतेसमोर ठेवण्याचा ही त्यांना अधिकार आहे. पण लोकशाहीच्या परंपरा जपायला हव्यात. अनादर होणार नाही. याला कुठं ही बाधा येणार नाही. अथवा डाग लागणार नाही, याची काळजी घेतली जावी. आजच्या दसऱ्याच्या दिवशी कोणतीही कटुता निर्माण होणार नाही. असं त्यांनी वागावं हे आवाहन मी करतो, असं अजित पवार म्हणालेत.
ठाकरे शिंदे गटाचे वाद इतक्या पराकोटीला गेलेले आहेत की, यात कोणी पुढाकार घ्यायचा हा मूळ प्रश्न आहे. शब्दाने शब्द वाढत आहेत, एकाने आरे म्हटलं की दुसऱ्याने कारे म्हणायचं. यातून वाद खालपर्यंत पोहचत आहेत. त्यामुळं त्यांना एकमेकांचे शत्रू वाटू लागतात. आपापल्या भूमिका सांगण्याचं कार्यक्रम झाला की राजकीय जोडे बाजूला ठेऊन, सलोख्याच्या भावनेनं पाहायला हवं, असंही ते म्हणालेत.
मी सभागृहात बोलतानाच एकनाथ शिंदेंना बोलून हे वाद मिटविण्याचे प्रयत्न केले. मात्र अद्याप हे वाद सुरूच आहेत. परंतु कोणताही वाद फार काळ टिकत नाही, त्यातून कटुता कमी होईल आणि जनतेसमोर हे दोघे जातील, असं अजित पवार म्हणालेत.