“…नाहीतर लोक म्हणतील ह्याच्या हातात माईक दिला की सोडतच नाही!”, अजित पवांरांच्या विधानाने सभागृहात हशा
बारामतीतील विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेचा आज 50 वा वर्धापन दिन पार पडला. यावेळी अजित पवार यांनी भाषण केलं.
नाविद पठाण, प्रतिनिधी, बारामती : बारामतीतील विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेचा आज 50 वा वर्धापन दिन (Vidya Pratishthan 50th Anniversary) पार पडला. या कायक्रमासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि या शिक्षण संस्थेतील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. पण या भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी एक मिश्किल वाक्य उच्चारलं त्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला.
“मी आता माझं भाषण आवरतं घेतो, नाहीतर लोक म्हणतील ह्याच्या हातात माईक दिला की सोडतच नाही!”, असं अजित पवार म्हणाले आणि सभागृहात एकच हशा पिकला.
यावेळी त्यांनी शिक्षण व्यवस्थेवरही भाष्य केलं. विद्यार्थ्यांना शिक्षक शिकवताना मुलांच्या कपाळाला आठ्या पडल्या नाही पाहिजेत, असं अजित पवार म्हणालेत. कुणी चुकत असेल तर त्याला सांगा. आपण समजावून सांगू. नाही ऐकलं तर त्याला बाहेरचा रस्ता दाखवा. काही अडचण असल्यास आम्हाला सांगा. विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही बांधिल आहोत, असंही अजितदादा म्हणाले.
मीही अर्थमंत्री होतो. पण कुणावर गंडांतर येईल असं कधी निर्णय घेतले नाही. आता दिपक केसरकर म्हणातात की, गृहपाठच बंद करायचा! केसरकरजी असं कसं चालेल. सरकारला ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांवर लक्ष द्यावंच लागेल. उद्या सरकारने काही चुकीचा निर्णय घेतला तर आपल्याला लोकांसाठी पुढे यावे लागेल, असं अजित पवार म्हणालेत.
दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या दिवशी पवार कुटुंबाला भेटण्यासाठी राज्यभरातून लोक बारामतीत येत असतात. हा कार्यक्रम शरद पवारांच्या गोविंद बाग या निवासस्थानी होतो. मात्र यंदा हा कार्यक्रम शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाच्या अप्पासाहेब पवार सभागृहात होणार असल्याचं बोललं जात होतं. त्यावरही अजित पवारांनी भाष्य केलं. यंदा पाडव्याला आपण भेटणारच आहोत.नेहमीप्रमाणे गोविंद बागेत भेट होईल. शरद पवारांना घरी जावून भेटलो, असं वाटावं यासाठी अप्पासाहेब पवार सभागृहात भेटीचा कार्यक्रम न घेता गोविंद बागेत घेतला, असं अजित पवार म्हणाले.