फडणवीस यांच्या मदतीने अमोल कोल्हेंनी प्रकल्प आणला, भाजप प्रवेशाच्या चर्चांवर अमोल कोल्हेंनी स्पष्टच सांगितलं…

ज्यांना माझ्याबद्दल शंका आहे, त्यांनी माझं संसदेतलं भाषण ऐका, म्हणजे त्यांना कळेल कुठे कभी खुशी, कुठे गम आहे, असा टोला अमोल कोल्हे यांनी लगावला आहे.

फडणवीस यांच्या मदतीने अमोल कोल्हेंनी प्रकल्प आणला, भाजप प्रवेशाच्या चर्चांवर अमोल कोल्हेंनी स्पष्टच सांगितलं...
Image Credit source: social media
| Updated on: Feb 11, 2023 | 8:49 AM

पुणेः राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या मदतीने पुणे नाशिक मेगा हायस्पीड रेल्वेला मंजुरी मिळवली. यानंतर अमोल कोल्हे आणि भाजपाची (BJP) जवळीक वाढल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. यावरून अमोल कोल्हे यांनी स्पष्टच उत्तर दिलंय. पुण्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘लोकशाहीत गेल्या काही दिवसात राजकारणाचा पोत बदलत चालला आहे. पक्षीय राजकारणाच्या सीमा पाळण्याची महाराष्ट्राच्या राजकारणाची उज्वल परंपरा होती. त्या सीमा किंवा रुपरेषा या निवडणुकीपुरत्या अधोरेखित होत होत्या. त्यानंतर राज्याच्या विकासासाठी किंवा आपल्या भागाच्या विकासासाठी पुन्हा संवादाला सुरुवात होत होती.

पुणे नाशिक हायस्पीडचा प्रकल्प असो किंवा शिरूर मतदार संघात एकूण 22 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प असो. ही सर्वसाधारण गोष्ट नाही. इथे हा संवाद जास्त गरजेचा आहे. हे प्रकल्प मंजूर होण्यात अजितदादांचा प्रकल्प आहे. इंद्रायणी मेडिसिटीच्या प्रकल्पालाही अजितदादांनी हातभार लावला आहे, असं वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केलंय.

तसेच आपल्या भागाच्या विकासासाठी किंवा लोकांच्या कल्याणासाठी काही होत असेल तर ही गोष्ट घडली म्हणजे त्याला राजकीय रंग आहे, असं म्हणता येत नाही. लोकांची कामं झाली पाहिजे.

ज्यांना माझ्याबद्दल शंका आहे, त्यांनी माझं संसदेतलं भाषण ऐका, म्हणजे त्यांना कळेल कुठे कभी खुशी, कुठे गम आहे, असा टोला अमोल कोल्हे यांनी लगावला आहे.

आढळराव पाटील यांनी हा प्रकल्प माझ्यामुळे आल्याचं म्हटलंय. यावरून अमोल कोल्हे यांनी स्पष्ट प्रत्युत्तर दिलंय. ज्यांना श्रेय घ्यायचंय त्यांनी घ्यावं. लोकांना माहिती आहे. २०१४ पासून भाजप सरकार होतं. शिवसेना युतीत होती. त्यावेळी प्रकल्पाला किती गती मिळाली आणि आजपर्यंत पाहा. प्रिन्सिपल अप्रूव्हल २०२० ला आलं. त्यानंतर अजितदादांनी अर्थसंकल्पात तयारी दाखवली. त्यानंतर बरीच प्रक्रिया दाखवली. सगळ्या तारखा पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध असलेल्या तारखा आहेत.

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी राज्यातील खासदारांची एक बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली होती. विरोधी पक्षातील सर्वच खासदारांनी उशीरा बैठक घेण्यात आल्याचं कारण सांगितलं. मात्र विरोधकांमधील एकमेव खासदार डॉ. अमोल कोल्हे हे बैठकीला हजर होते. अमोल कोल्हे यांनी पुणे-नाशिक मेगा हायस्पीड रेल्वेला मंजुरी मिळावी, अशी मागणी केली होती. मात्र प्रत्यक्ष अर्थसंकल्पात याबाबत कोणतीच घोषणा झाली नव्हती. अर्थसंकल्पात याबाबत काहीच घोषणा झाली नाही. त्यामुळे खा. कोल्हे यांनी नाराजी दर्शवली होती.

देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून या प्रकल्पाला तत्वतः मंजुरी मिळवली. खा. कोल्हे यांनी या दोघांचेही आभार मानले. त्यानंतर अमोल कोल्हे आणि भाजपच्या जवळीकीची चर्चा जास्त जोर धरू लागली.