दोन्हीही पक्ष थकलेत, भविष्यात काँग्रेस-राष्ट्रवादी एक होईल : सुशीलकुमार शिंदे
यापूर्वीही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विलिनीकरणाचं वृत्त फेटाळलं होतं. पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा (NCP merger Sushil Kumar Shinde) ही चर्चा सुरु झाली आहे.
सोलापूर : लोकसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा धोबीपछाड झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे (NCP merger Sushil Kumar Shinde) यांनी मोठं वक्तव्य केलंय. भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकच होणार असल्याचं शिंदे यांनी सभेला संबोधित करताना सांगितलं. दोन्हीही पक्ष थकले असून भविष्यात एकत्र येणार आहोत, असं वक्तव्य शिंदे यांनी केलं. यापूर्वीही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विलिनीकरणाचं वृत्त फेटाळलं होतं. पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा (NCP merger Sushil Kumar Shinde) ही चर्चा सुरु झाली आहे.
दोन्ही पक्ष एकाच झाडाखाली कधी तरी बसलो आहोत, एकाच आईच्या मांडीवर दोन्हीही पक्ष वाढले आहेत, त्यामुळे आमच्या मनात खंत आहे आणि तीच खंत शरद पवारांच्याही मनात आहे. मात्र ते बोलून दाखवत नाहीत. मात्र योग्य वेळ आल्यास ते करतील, असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलंय. सोलापूर उत्तर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार मनोहर सपाटे यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यक्रमात शिंदे बोलत होते.
यापूर्वी लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर दोन्ही काँग्रेस एकत्र येणार असल्याचं बोललं जात होतं. पण याला शरद पवारांच्या स्पष्टीकरणानंतर पूर्ण विराम मिळाला. शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत 1999 ला राष्ट्रवादीची स्थापना केली. त्यांनी राष्ट्रवादी पक्षाची वाढ महाराष्ट्रासह राज्याबाहेरही केली.
पवारांनी 20 वर्षांपूर्वी काँग्रेस का सोडली होती?
20 वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोनिया गांधी परदेशी वंशाच्या (इटालियन) आहेत म्हणून त्यांच्याकडे काँग्रेसचे नेतृत्व देण्यास विरोध केला होता. काँग्रेसचे नेतृत्व परदेशी नागरिकाकडे देऊ नये यासाठी शरद पवार यांच्यासह त्यांचे सहकारी पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनी पक्षांतर्गत बंडखोरी करत सोनिया गांधींचा विषय लावून धरला आणि थेट सोनिया गांधींनाच आव्हान दिलं.
यानंतर काँग्रेसने शिस्तभंगाची कारवाई करत शरद पवार, पी. ए. संगमा आणि तारिख अन्वर यांचं निलंबन केलं. निलंबनानंतर तात्काळ या तिघांनीही मे-जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यावेळी भारतीय समाजवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्यात आलं होतं.
शरद पवारांनी सोनिया गांधींच्या नेतृत्वाला विरोध करताना त्यांच्या परदेशी नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, खरे कारण शरद पवार यांची महत्वकांक्षा असल्याचेही त्यावेळी बोललं गेलं. काँग्रेसचे अध्यक्षपद आपल्याकडे येणार नाही, असं लक्षात आल्यानंतरच पवारांनी उघडउघड बंडखोरी करुन सोनिया गांधींच्या नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. हा मुद्दा उपस्थित करण्यात पवारांचे सहकारी तारिक अन्वर हे त्यावेळी आघाडीवर होते, असंही बोललं जातं.
विशेष म्हणजे आजमितीस शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीची स्थापना करणाऱ्या पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर या दोन्ही सदस्यांनी याआधीच राष्ट्रवादीला रामराम ठोकला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ज्या मुद्द्यावर झाली, पुढे त्याच सोनिया गांधींच्या नेतृत्वातील काँग्रेससोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी सत्तेत भागीदारी केली. राज्यासह केंद्रातही राष्ट्रवादीने काँग्रेसला पाठिंबा दिला. स्वतः शरद पवार काँग्रेसच्या नेतृत्वातील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारमध्ये कृषीमंत्री होते.
संबंधित बातम्या :