समित कदम आणि देवेंद्र फडणवीसांचे संबंध काय? अनिल देशमुखांनी संपूर्ण कुंडलीच मांडली
मिरज, सांगली या भागात चौकशी केली तर कोणीही तुम्हाला देवेंद्र फडणवीस आणि समित कदम यांचे काय संबंध आहेत हे सांगेल", असाही गौप्यस्फोट अनिल देशमुखांनी केला.
Samit Kadam-Devendra Fadnavis Relation : “ईडीच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी यांनी मला एक प्रस्ताव दिला होता. मात्र मी तो नाकारला. हा प्रस्ताव घेऊन एक व्यक्ती माझ्याकडे आली होती. त्या व्यक्तीचे नाव समित कदम असे होते”, असा खुलासा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केला. अनिल देशमुख यांनी नुकतंच एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेवेळी अनिल देशमुख यांनी समित कदम आणि देवेंद्र फडणवीसांचे संबंध काय? याची सर्व माहिती दिली.
“तीन वर्षांपूर्वी जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे मिरजचे समित कदम यांना पाच-सहा वेळा पाठवले. एकदा तो माझ्याकडे सील केलेले पाकिट घेऊन आला. त्याने मला सांगितलं की याचं तुम्ही प्रतिज्ञापत्र करुन द्या. त्यात लिहिलं होतं की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार यांसह अनेक नेत्यांवर मी खोटे आरोप करायचे. त्या खोट्या आरोपाचे मी प्रतिज्ञापत्र करुन द्यायचं. माझ्याकडे ते पाकिट आणून देणारा तो माणूस म्हणजे समित कदम”, असे अनिल देशमुख म्हणाले.
कोण आहे समित कदम?
“समित कदम हा मिरजचा आहे. समित कदम आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे संबंध आहेत. त्यांनी अनेकदा देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर उपलब्ध आहेत, असा खुलासा अनिल देशमुख यांनी केला. यावेळी अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस आणि समित कदम यांचे एकत्रित काही फोटोही प्रसारमाध्यमांना दाखवले.
समित कदमला Y दर्जाची सुरक्षा
समित कदम आणि देवेंद्र फडणवीस यांचे अगदी घरगुती संबंध आहेत. समित कदम यांची पत्नी देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधतानाही फोटो पाहायला मिळत आहे. समित कदम हा अतिशय साधा कार्यकर्ता आहे. तो नगरसेवकही नाही. देवेंद्र फडणवीसांनी समित कदमला Y स्वरुपाची सुरक्षा दिली आहे. जर तुम्ही मिरज, सांगली या भागात चौकशी केली तर कोणीही तुम्हाला देवेंद्र फडणवीस आणि समित कदम यांचे काय संबंध आहेत हे सांगेल”, असाही गौप्यस्फोट अनिल देशमुखांनी केला.