रायगड : राष्ट्रवादी काँग्रेसने रायगड जिल्हा राष्ट्रवादी पक्षाच्या संघटनेत मोठा फेरबदल केला आहे (NCP appoint Suresh Lad as new raigad district president ). राष्ट्रवादीने जिल्हाध्यक्ष पदावरील दत्तात्रय मसुरकर यांची तडकाफडकी उचलबांगडी केली. या ठिकाणी पक्षाचे निष्ठावंत आणि खासदार सुनील तटकरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश लाड यांची नियुक्ती करण्यात आली. ते कर्जत-खालापूरचे माजी आमदार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरेश लाड यांना जिल्हाध्यक्ष पदावर निवडल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी आमदार सुरेश लाड यांची नियुक्ती केली. याबाबत ते स्वतः आज (25 जुलै) सुरेश लाड यांना पेण येथे नियुक्तीचं पत्र देतील.
दरम्यान, रायगडमध्ये महाविकासआघाडीतील मित्रपक्षांमधील समन्वयाचाही प्रश्न उपस्थित झाला होता. कोकणातील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदावरुन मतभेद होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत 23 जुलै रोजी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक येथे बैठक घेतली होती.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह कोकणातील शिवसेनेचे आमदार आणि खासदार उपस्थित होते. तर राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे, उद्योग आणि पर्यटन राज्यमंत्री आणि रायगडच्या पालकमंत्री मंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या.
या बैठकीत उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्याकडून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यापुढे आपल्याला महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहायचं आहे. तसेच पुढील निवडणुकाही एकत्र लढवायच्या आहेत, असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं, अशी माहिती सूत्रांनी दिली होती.
हेही वाचा :
NCP appoint Suresh Lad as new raigad district president