राष्ट्रवादीने आघाडी धर्म न पाळल्यानेच काँग्रेसचा पराभव : अशोक चव्हाण
लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचं कारण आघाडीतील गटतट असल्याचं खुद्द अशोक चव्हाण यांनीच मान्य केलंय. खुद्द अशोक चव्हाण यांचाही नांदेडमधून पराभव झालाय.
मुंबई : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने काही जागांवर आघाडी पाळली नाही हे सत्य आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. काँग्रेसच्या आढावा बैठकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांचाही हाच सूर पाहायला मिळाला, असंही अशोक चव्हाण म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचं कारण आघाडीतील गटतट असल्याचं खुद्द अशोक चव्हाण यांनीच मान्य केलंय. खुद्द अशोक चव्हाण यांचाही नांदेडमधून पराभव झालाय. नांदेडमध्ये राष्ट्रवादीने मदत केली नसल्याचा आरोप त्यांनी पराभवानंतरही केला होता.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक असणाऱ्या आमदारांवर कारवाई होणार नसल्याचं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. आमदारांनी मुख्यमंत्र्यांना भेटणं हे चुकीचं नाही. मतदारसंघातील कामांसाठी आमदार मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. मुख्यमंत्र्यांची भेट घेतली म्हणजे ते पक्ष सोडत नसतात, असंही अशोक चव्हाण म्हणाले. काँग्रेस नेत्यांनी कोकण जिल्हानिहाय कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी हे संकेत दिले.
विधानसभेच्या तोंडावर आघाडीत बिघाडी?
यापूर्वी काँग्रेसच्या विविध बैठकांमध्ये राष्ट्रवादीने स्थानिक पातळीवर मदत केली नसल्याचा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला होता. यावेळी खुद्द अशोक चव्हाण यांनीही ही गोष्ट मान्य केली. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. विधानसभा निवडणूक तीन महिन्यांवर असताना आघाडीत बिघाडी असल्याचं चित्र आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी शिवसेना-भाजप यांच्यात जागा वाटपाच्या टप्प्याची चर्चा सुरु आहे.
काँग्रेसच्या अध्यक्षांपासून प्रदेशाध्यक्षांपर्यंत पराभव
या निवडणुकीत काँग्रेसचा महाराष्ट्राप्रमाणेच देशातही दारुण पराभव झाला. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा पारंपरिक मतदारसंघ अमेठीतून पराभव झाला. तर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या नांदेडमध्ये पराभव झाला. महाराष्ट्रात काँग्रेसने चंद्रपूरची एकमेव जागा जिंकली, तर राष्ट्रवादीने 4 जागा जिंकल्या आहेत. शिवसेना-भाजप यांच्या युतीने 48 पैकी 41 जागा जिंकल्या.