Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना बारामतीच्या होम पीचवर मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अजून लोकसभा निवडणूक 2024 च्या सामन्याला सुरुवात झालेली नाही. पण त्याआधी स्वकीयांकडूनच अजित पवार यांची साथ सोडण्याचे संकेत मिळत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना रंगण्याची शक्यता आहे. पवार कुटुंबातच ही लढत होण्याची शक्यता असून नणंद विरुद्ध भावजय असा सामना होऊ शकतो. बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. पण आता पवार कुटुंबातच राजकीय फाटफूट झाल्याने बारामतीच्या कौल कुणाला? याकडे देशाच लक्ष लागलं आहे. म्हणून लोकसभा निवडणूक 2024 ची घोषणा होण्याआधी बारामती लोकसभा मतदारसंघाची चर्चा सुरु झाली आहे.
बारामतीमध्ये शरद पवार यांना मानणारा जसा मोठा वर्ग आहे, तशी अजित पवार यांची सुद्धा ताकद आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही गटांची बारामतीमधील राजकीय ताकद किती? यावर शिक्कामोर्तब होणार आहे. नुकतच अजित पवार एका भाषणात म्हणाले होते की, “बारामतीत मला एकट पाडलं जाईल, कुटुंबातील कुणीही व्यक्ती माझ्यासोबत नसेल” आता बारामतीत तसच घडताना दिसतय. त्याची सुरुवात झाली आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये काका-पुतण्याच नातं आहे.
कोण आहेत युगेंद्र पवार?
महाराष्ट्राच्या राजकारणात पुतण्याने जसा आपल्या काकाला धक्का दिला, तसच बारामतीत अजित पवार यांना त्यांचा सख्खा पुतण्या धक्का देऊ शकतो. युगेंद्र पवार हे अजित पवारांचे सख्खे पुतणे आहेत. युगेंद्र पवार हे श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. युगेंद्र पवार हे बारामतीमधील शरद पवार यांच्या कार्यालयाला भेट देणार आहेत. त्यावरुन युगेंद्र पवार हे शरद पवार यांच्या गटात सहभागी होणार, अशी राजकीय चर्चा रंगली आहे. युगेंद्र पवार यांच्याविषयी शरद पवार म्हणाले की, ते अमेरिकेतून शिकून भारतात आले आहेत. युगेंद्र पवार हे बारामतीत काही संघटनाचे अध्यक्ष आहेत. त्यांचा मोठा जनसंर्पक आहे. युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांना साथ दिल्यास तो अजित पवार यांच्यासाठी एक धक्का असेल.