राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनेत्रा पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. तुमची निवड बिनविरोध आहे या पत्रकारांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवार म्हणाल्या की, ’18 तारीख शेवटची आहे, तो पर्यंत वाट बघावी लागेल’ “पक्षाने मला राज्यसभेची उमेदवारी दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार तसेच पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सगळ्याचेचं मी मनापासून आभार मानते. एक अधिकृत पक्षाचा आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून जो विश्वास माझ्यावर पक्षाने दाखवलाय. त्या संधीच सोन करण्याचा प्रयत्न करेन” असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.
तुम्हाला उमेदवारी मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज आहेत का? या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, “अशी नाराजी कुठे दिसली नाही, भुजबळ फॉर्म भरतातना उपस्थित होते. त्यांनी शुभेच्छा दिल्या. नक्कीच कोणती नाराजी नाही” सुरुवातीला अजित पवार तुम्हाला उमेदवारी द्यायला तयार नव्हते का? या प्रश्नावरही सुनेत्रा पवार यांनी उत्तर दिलं. “खरतर मला उमेदवारी द्यावी ही पक्षातून आणि जनतेतून मागणी होत होती. आग्रह धरु नये म्हणून मी कार्यकर्त्यांना विनंती केली. लोकसभेच्या उमेदवारीवेळी सुद्धा जनतेतून मागणी करण्यात आली होती”
पार्थ पवार नाराज का?
पार्थ पवार सुद्धा राज्यसभेसाठी इच्छुक होते, तुमच्या उमेदवारीमुळे ते नाराज आहेत का? या प्रश्नावर सुनेत्रा पवार म्हणाल्या की, “त्याने स्वत:च सांगितलं की, सगळ्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार मी राज्यसभेच अधिकृत उमेदवार असलं पाहिजे. त्याचा सुद्धा आग्रह होता. सगळ्या पक्षाच्या सहमतीने उमेदवारी जाहीर झालीय” असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.
भुजबळांनी नाराजी व्यक्त केली
दरम्यान आज सकाळी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याने छगन भुजबळ नाराज असल्याची बातमी आली. अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर राज्यसभा उमेदवारीबाबत बैठक झाली. या बैठकीत भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.