Sharad Pawar Birthday | 81 पावसाळे पाहिलेला योद्धा; शरद पवारांच्या 81 गोष्टींचा खास आढावा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज (12 डिसेंबर) 80 वा वाढदिवस आहे. (NCP Chief Sharad Pawar 80th Birthday Special)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज (12 डिसेंबर) 80 वा वाढदिवस आहे. शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून राज्यात ठिकठिकाणी जय्यत तयारी केली आहे. शरद पवार आज 81 वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्ताने शरद पवारांच्या 81 गोष्टींचा खास आढावा….(NCP Chief Sharad Pawar 80th Birthday Special)
1) शरद पवारांचे आज 81 व्या वर्षात पदार्पण शरद गोविंदराव पवार….शरद पवार एवढ्याच नावानं गेली 50 वर्षे देश व राज्याच्या राजकारणात हे व्यक्तिमत्व केंद्रस्थानी राहिलं. आज पवार 80 वर्षे पूर्ण करुन 81 व्या वर्षात पदार्पण करत आहेत.
2) सामाजिक कार्याचा वारसा आई-वडिलांकडूनच गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवारांच्या 11 मुलांपैकी शरद पवार हे एक आहेत. गोविंदराव हे 1940-50 च्या दशकात सहकार क्षेत्रात अग्रणी होते. तर आई शारदाबाई तीन वेळा जिल्हा मंडळाची निवडणूक जिंकल्या होत्या.
3) पवार शिक्षणात सामान्य, राजकारणात असामान्य शरद पवारांचे भाऊ शरदरावांनी शिकावे असा आग्रह धरत होते. पण पवार शिक्षणात सामान्य होते. चळवळी,सामाजिक आणि पुढे राजकारणातच त्यांचे मन जास्त जमले. पवारांचे इतर भाऊ मात्र उच्चविद्याविभूषित झाले.
4) 1 ऑगस्ट 1967 ला पवार विवाहबंधनात सदू शिंदे अर्थात सदाभाऊ शिंदे हे शरद पवारांचे सासरे. पत्नी प्रतिभा शिंदे यांच्यासोबत पवारांचे 1 ऑगस्ट 1967 ला लग्न झाले. मुलगा शिकलेला आहे, पण काहीच करत नाही अशी माहिती ऐकून सासरे नाखूष होते. लग्न झाले त्यावेळी शरद पवार आमदार होते.
5) घर शेकापचे, पण पवारांना आकर्षण काँग्रेसचे शरद पवारांमध्ये बंडाचे गुण अगदी लहानपणापासूनच होते. घरात सारे जण शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचे होते. पण पवारांना मात्र काँग्रेसचं आकर्षण होतं. त्यामुळंच की काय 1958 साली ते युवक काँग्रेसमध्ये सहभागी झाले.
6) गुरु यशवंतरावांनी ओळखले चेल्याचे गुण शरद पवारांना यशवंतराव चव्हाणांचे खूप आकर्षण होते. त्यांनाच पवारांनी गुरु मानले. त्यांनी या शिष्यातलं सामर्थ्य ओळखलं आणि 1967 साली म्हणजे वयाच्या 27 व्या वर्षीच पवारांच्या गळ्यात आमदारपदाची माळ गळ्यात पडली.
7) यशवंतरावांसोबत पवार काँग्रेस (R) मध्ये 1969 ला राष्ट्रीय काँग्रेसचं विभाजन झालं. त्यावेळी शरद पवारांनी यशवंतरावांसोबत इंदिरा गांधींच्या काँग्रेस आर मध्ये प्रवेश केला.
8) यशवंतरावांमुळे 34 व्या वर्षी पवार गृहमंत्रीपदी 1970 च्या दशकात वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते. पवारांना मंत्रिमंडळात घेऊन गृहखात्याचा पदभार द्या अशी सूचना यशवंतरावांनी वसंतरावांना केली होती. त्यामुळं वसंतरावांनंतर शंकरराव चव्हाणांच्या मंत्रिमंडळातसुद्धा पवारांकडेच गृहखातं राहिलं होतं.
9) जिकडे यशवंतराव, तिकडे शरद पवार 1977 मध्ये काँग्रेसचा देशभर दारुण पराभव झाला. महाराष्ट्रातल्या पराभवाची जबाबदारी घेऊन शंकररावांनी राजीनामा दिला आणि वसंतदादांना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागली. पण राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पुन्हा फूट पडून पवारांनी यशवंतरावांसोबत काँग्रेसची साथ सोडली.
10) वसंतदादांच्या पाठीत खंजीर अन् पवार मुख्यमंत्रीपदी 1978 ची विधानसभा निवडणूक काँग्रेस (I) आणि काँग्रेस(U)या दोन गटांनी स्वतंत्र लढली. पण सत्ता टिकावी म्हणून दोन्ही गट पुन्हा एकत्र आले. जुलै 78 मध्ये पवारांनी वसंतदादांना अंधारात ठेवून 12 आमदारांना सोबत घेत सरकार पाडले आणि शेकाप-जनता पार्टीची आघाडी करुन स्वतः मुख्यमंत्री बनले.
11) महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले शरद पवार 1978 ला मुख्यमंत्री बनले तेव्हा शरद पवार फक्त 38 वर्षांचे होते. सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांनी स्वतः मिळवला. पण पवारांनी स्थापन केलेले पुलोद सरकार दीड महिन्यांतच इंदिरा गांधींनी बरखास्त करुन टाकलं.
12) इंदिरांनी बरखास्त केले होते पवारांचे सरकार शरद पवारांनी काँग्रेस फोडल्याचा आणि सरकार पाडल्यानं दिल्लीतल्या हायकमांडला मोठा संताप आला. पण दिल्लीत सत्ता नसल्यानं त्यांचं काही चाललं नाही. 1980 ला इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर फेब्रुवारी 1980 मध्ये म्हणजे 18 महिन्यांचं हे सरकार बरखास्त करुन टाकलं.
13) 1984 साली पवार पहिल्यांदा झाले खासदार 1983 ला शरद पवार समाजवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले. पुढच्याच वर्षी म्हणजे 84 ला शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून गेले. इथूनच त्यांचं राष्ट्रीय राजकारण सुरू झालं.
14) पवार वर्षभरात कंटाळले होते राष्ट्रीय राजकारणाला पवार खासदार झाले तरी वर्षभरातच त्यांचं मन राष्ट्रीय राजकारणाला कंटाळलं. त्यामुळं 1985 ला ते पुन्हा विधानसभेची निवडणूक लढवून आमदार झाले आणि लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन राज्याच्याच राजकारणात राहिले.
15) 1985 ला शरद पवार होते विरोधी पक्षनेते 1985 च्या निवडणुकीत पवारांच्या समाजवादी काँग्रेसला 54 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसचे अ.र.अंतुले मुख्यमंत्री झाले होते. त्यावेळी शरद पवार विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून निवडले होते.
16) 1985 लाच पवार भाजपसोबत गेले होते शरद पवार भाजपसोबत जातील की नाही असा प्रश्न आज विचारला जातो. पण 1985 ला पुरोगामी लोकशाही आघाडीचे नेते होते, त्यामध्ये शेकाप आणि जनता पार्टीसोबत भाजपसुद्धा होता. या आघाडीनेच पवारांना विरोधी पक्षनेते बनवले.
17) शिवसेनेला रोखण्यासाठी गेले होते पवार काँग्रेसमध्ये शरद पवार सध्या शिवसेनेसोबत आहेत. पण राज्यात शिवसेनेची वेगानं वाढ होतेय असं कारण देऊन पवारांनी 1987 साली समाजवादी काँग्रेस सोडून इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.काँग्रेसची संस्कृती टिकवली पाहिजे असंही ते त्यावेळी म्हणाले होते.
18) 1988 साली पवार पुन्हा मुख्यमंत्रीपदी 26 जून 1988 साली पंतप्रधान राजीव गांधी यांनी शरद पवारांना काँग्रेसमध्ये घेऊन मुख्यमंत्रीपदी बसवले. मुख्यमंत्री असलेल्या शंकरराव चव्हाणांना केंद्रात बोलावून अर्थमंत्री बनवले होते. याच दरम्यान शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणातले केंद्रबिंदून बनून गेले.
19) 1989 च्या निवडणुकीत राजीव गांधींचा विश्वास सार्थ पवारांना मुख्यमंत्री केल्यानंतर दोनच वर्षात झालेल्या लोकसभा निवडणुकीत पवारांनी 48 पैकी 28 खासदार काँग्रेसचे निवडून आणले. शिवसेनेचा प्रभाव या काळात खूप होता.
20) भाजप-सेना युतीचे आव्हान पवारांनी मोडले 1990 ची विधानसभा निवडणूक पवारांच्या नेतृत्वाखाली लढली. शिवसेना-भाजप युतीचं त्यांच्यासमोर मोठं आव्हान होतं. तरीही पवारांनी 141 जागा जिंकत काँग्रेसची सत्ता महाराष्ट्रात कायम ठेवली होती.
21) 1990 ला पवार तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी 4 मार्च 1990 ला शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली. 12 अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यावर त्यांनी हे सरकार स्थापन केलं होतं.
22) 1991 पवार पुन्हा राष्ट्रीय राजकारणात 1991 ला राजीव गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसला सत्तास्थापनेची संधी मिळाली. नरसिंहराव पंतप्रधान झाले. त्यांनी पवारांना संरक्षण खाते दिले. पवार 2 वर्षे या संरक्षण खात्यामध्ये होते.1993 च्या बाँबस्फोटानंतर मुंबई शांत करण्यासाठी नरसिंहरावांनी पुन्हा पवारांना मुंबईत पाठवलं होतं.
23) 1991 ला पंतप्रधानपदासाठी पवारांची गुगली 1991 ला पवारांना मुख्यमंत्रीपदाची संधी येता येता हुकली. नरसिंहराव पक्षाध्यक्ष होते. तेच पंतप्रधान होणार असल्यानं पवारांनी पक्षाध्यक्ष आणि पंतप्रधान वेगळा असावा अशी भूमिका पवारांनी मांडली. पण डाळ शिजत नसल्याचं लक्षात येताच पवारांनी पंतप्रधानपदाचा नाद त्यावेळी सोडला.
24) 93 च्या बॉम्बस्फोटांमुळे पवार चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदी नरसिंहरावांच्या काळात पवार दोन वर्षे संरक्षणमंत्री होते. पण मुंबई बॉम्बस्फोटांमुळे सुधाकरराव नाईकांनी राजीनामा दिला आणि पवारांना पुन्हा राज्याच्या राजकारणात पाठवलं गेलं. 6 मार्च 1993 पवारांनी चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
25) चांगल्यासाठी पवार बोलले साफ खोटे ! बॉम्बस्फोटांनंतर शांतता राखली जावी म्हणून शरद पवारांनी लोकांची दिशाभूल करणारं वक्तव्य केलं होतं. बाँबस्फोटामुळे हिंदू-मुस्लिम दंगल होऊ नये म्हणून पवारांनी 12 नव्हे तर 13 बॉम्बस्फोट झालेत आणि 13 वा बॉम्बस्फोट मस्जिद बंदरला झालाय असं टीव्हीवर येऊन सांगितलं होतं.
26) शांततेसाठी पवार दुसऱ्यांदा खोटे बोलले बॉम्बस्फोटांनंतर हिंदू-मुस्लिमांतले वैर वाढू नये म्हणून पवारांनी आणखी एक खोटी माहिती सांगितली. बॉम्बस्फोटांमध्ये तमिळ टायगर्स या संघटनेचा हात असल्याचे पुरावे मिळत आहेत असं पवार म्हणाले होते.
27) पवारांची चौथी कारकीर्द नकारात्मक घटनांची पवारांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चौथ्या कारकिर्दीत नागपुरात 94 साली गोवारी हत्याकांड घडले. त्यात 114 गोवारी-वंजारी लोक मारले गेले. पवारांचे आदिवासी विकास मंत्री आंदोलकांना न भेटल्याने चेंगराचेंगरी झाल्याचा आरोप झाला. परिणामी मधुकर पिचड यांना राजीनामा द्यावा लागला. (NCP Chief Sharad Pawar 80th Birthday Special)
28) पवारांनी केला मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार शरद पवारांनी 14 जानेवारी 1994 रोजी मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेनं याला विरोध करत काहूर माजवले होते.
29) 1995 ला पवारांच्या हातची सत्ता गेली बाँबस्फोट,गोवारी हत्याकांड आणि नामविस्तारानंतरच्या दंगली यामुळं शरद पवार सरकारविरुद्ध असंतोष निर्माण झाला. 1995 च्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीत काँग्रेसची सत्ता गेली आणि राज्यातही भाजप-शिवसेना युतीचं सरकार आलं.
30) अण्णा नि खैरनार उतरले होते पवारांविरुद्ध मैदानात शरद पवार 1993 ला पुन्हा मुख्यमंत्री म्हणून परतल्यानंतर अण्णा हजारे आणि गो रा खैरनार यांनी पवारांवर अनेक आरोप करत भ्रष्टाचाराविरोधात लढा उभारला. या दोघांनी पवारांविरोधात महाराष्ट्रात मोहिमही उघडली होती. ट्रकभर पुरावे असल्याचे दावे दोघेही पूर्ण करु शकले नाहीत.
31) 1996 ला पवार तिसऱ्यांदा राष्ट्रीय राजकारणात 1995 च्या मार्चमध्ये पवारांनी सत्ता गमावली. त्यानंतर ते विरोधी पक्षनेते झाले. पण 1996 च्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून पुन्हा तिसऱ्यांदा राष्ट्रीय राजकारणात उडी घेतली.
32) काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पवार हरले जून 1997 ला काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली. त्यावेळी सीताराम केसरी, शरद पवार आणि राजेश पायलट हे अध्यक्षपदासाठी उभे होते. पवारांना 8 हजारांपैकी फक्त 882 च मतं त्यावेळी मिळाली होती.
33) सोनियांच्या विदेशी जन्माच्या मुद्यावरुन पवारांची हकालपट्टी 1999 मध्ये पवारांनी ऐन निवडणुकीपूर्वी काँग्रेसनं सोनियांच्या परदेशी जन्माचा मुद्दा उचलला. देशी जन्माची व्यक्ती पंतप्रधानपदाचा उमेदवार असावी असा सल्ला दिला. त्याला कडाडून विरोध झाला आणि पवारांना सहा वर्षांसाठी निलंबित केलं.
34) जून 1999 ला पवारांकडून राष्ट्रवादीची स्थापना काँग्रेसनं 25 मे 1999 ला हकालपट्टी केल्यानंतर शरद पवारांनी 15 दिवसांतच म्हणजे 10 जून 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. प्रफुल्ल पटेल, पद्मसिंह पाटील, मोहिते पाटील, छगन भुजबळांसह अनेक बडे नेते काँग्रेस सोडून पवारांसोबत गेले.
35) काँग्रेसमधून बाहेर पण पुन्हा काँग्रेससोबत राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर 4 महिन्यांतच महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाली. त्यामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीने 58 जागा जिंकल्या. पवारांसाठी हा मोठाच विजय होता. भाजप-शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पवारांनी पुन्हा काँग्रेसशी हातमिळवणी करुन सत्ता स्थापन केली.
36) 10 वर्षे पवार होते कृषी मंत्रिपदावर 2004 मध्ये दिल्लीत युपीएचे सरकार आले. पवार या सरकारमध्ये कृषीमंत्रिपदावर होते. 2009 मध्ये पुन्हा युपीएचं सरकार आल्यानंतरही पवारांनी कृषी खात्यालाच पसंती दिली.
37) पवारांच्या काळात गहू घोटाळा गाजला कृषिमंत्रिपदी असताना पवारांवर गहू आयातीच्या घोटाळ्याचा आरोप झाला होता. साठेबाजांच्या हितासाठी पवारांनी निर्णय घेतल्याची टीका विरोधक करत होते. याच काळात ते बीसीसीआयचे अध्यक्ष झाले होते.
38) साखरेच्या कृत्रिम दरवाढीचा पवारांवर आरोप 2009 साली पवारांनी साखरेच्या किंमती मुद्दाम वाढवल्याचाही आरोप झाला होता.आयातदारांना लाभ व्हावा म्हणून पवारांनी साखर 50 रुपयांपर्यंत नेल्याची टीका माकपनं केली होती.
39) शेतकरी आत्महत्या रोखण्यात पवार अयशस्वी पवारांचे राजकारण बहरत असतानाच शेतकरी आत्महत्या वाढत होत्या. पवार मुख्यमंत्रीपदी व 10 वर्षे कृषि मंत्रिपदी असतानासुद्धा त्यांना हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवता आल्या नाहीत.
40) अण्णांच्या आक्षेपांमुळे पवारांनी लोकपाल समिती सोडली 2011 साली लोकपाल विधेयकाच्या मसुद्यासाठी समिती स्थापन केली. त्यात शरद पवारसुद्धा होते. पण अण्णा हजारेंनी पवारांच्या नावाला आक्षेप घेताच पवारांनी समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
41) 2012 ला पवार लोकसभेतून निवृत्त 2012 साली पवारांनी त्यांच्या चाहत्यांना धक्का दिला. यापुढे लोकसभा निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा त्यांनी 2014 च्या निवडणुकीपूर्वी दोन वर्षे आधी केली. लोकसभेऐवजी त्यांनी राज्यसभेचा मार्ग निवडला.
42) 2014 ला सोडली पवारांनी काँग्रेसची साथ 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर लोक काँग्रेसला नाकारत असल्याचं पवारांनी ओळखलं. विधानसभा निवडणुकीच्या फक्त काही दिवस आधी सरकारमधून बाहेर पडून काँग्रेसची साथ सोडली आणि स्वतंत्र निवडणूक लढवली.
43) पवार टिकवतात राजकारणातला ‘रिलिवन्स’ 2014 ला राज्यात भाजप 122 जागांसह सर्वात मोठा पक्ष होता. शिवसेनेनं पाठिंबा देण्यापूर्वीच पवारांनी भाजपला पाठिंबा देऊन शिवसेनेची बार्गेनिंगची हवाच काढून टाकली. राजकारणातला रिलीवन्स टिकवण्याचा पवारांचा तो प्रयत्न होता.
44) पवारांचे राजकारण सामंजस्याचे शरद पवार कधीच टोकाची भूमिका घेत नाहीत. त्यामुळं विरोधी पक्षातल्या लोकांनाही पवार जवळचे वाटतात. 2015 ला अमृतमहोत्सवानिमित्त गौरव केलेल्या कार्यक्रमाला मोदी आणि सोनियासुद्धा एकाच व्यासपीठावर होते.
45) पवार अजातशत्रू, सर्वच पक्षात मित्र शरद पवारांनी 50 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीला 50 वर्षे झाल्या; दिल्लीमध्ये विशेष कार्यक्रमात पवारांचा गौरव करण्यात आला होता. त्यावेळीही राष्ट्रपती, पंतप्रधानांसह सर्वच पक्षांचे प्रमुख हजर होते.
46) 2019 नंतर पवार पुन्हा राज्यातच सक्रीय 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींचीच जादू चालली. त्यामुळं राष्ट्रीय राजकारणात पवारांसाठी फार संधी उरली नाही. त्यामुळं ऑक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवर त्यांनी लक्ष केंद्रीत केलं.
47) पवारांनी महाराष्ट्रात रोखली भाजपची विजयी घोडदौड 2019 च्या निवडणुकीत कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालं नाही. भाजपच्या दगाबाजीमुळं शिवसेना दुखावली. पवारांनी ही संधी साधून दुखावलेल्या शिवसेनेला आणि काँग्रेसला सोबत घेऊन सरकार स्थापन करुन भाजपची विजयी घोडदौड महाराष्ट्रात रोखली.
48) भाजपचा ED चा डाव पवारांनी उलटवला भाजपकडून CBI, ED सारख्या संस्थांकडून विरोधकांना नामोहरम केलं जात आहे. हाच डाव पवारांवरही 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपनं खेळला. पण पवारांनी मीस्वतःच ED कडं जातो म्हणून डाव उलटवून लावला.(NCP Chief Sharad Pawar 80th Birthday Special)
49) पवारांनी खुबीनं घेतली साताऱ्यात भर पावसात सभा 2019 च्या विधानसभा निवडणुकीतली पवारांची साताऱ्यातली भर पावसातली सभा प्रचंड गाजली. राष्ट्रवादीला संजीवनी देणारी ही सभा ठरली. या सभेनं ऐन मतदानापूर्वी वातावरणच बदलवून टाकलं.
50) शरद पवारांना पद्मविभूषण या दुसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आलं. 2017 साली त्यांचा हा गौरव झाला. विशेष म्हणजे नरेंद्र मोदींच्या भाजप सरकारनं त्यांचा हा गौरव केला. पवार आणि मोदींच्या सुप्त मैत्रीला मजबुती देणारा हा गौरव मानला जातो.
51) शिवरायांप्रमाणे पवारांचा दिल्लीशी कायम संघर्ष दिल्लीतल्या हायकमांडविरुद्ध 4 हात करण्यामुळे पवारांचं राजकारण मजबूत होत होतं. पवारांनी इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी या तिन्ही बड्या नेत्यांशी वैर ओढवून घेतलं आणि माघार घेत हातात हातही घेतला. सध्या मोदी-शाहा या दिल्लीतल्या दुकलीविरुद्धही पवार लढतच आहेत.
52) पवारांना पंतप्रधानपदाची संधी आहे का ? शरद पवारांमध्ये पंतप्रधान होण्याचे पोटेन्शियल आहे, पण त्यांच्या बेभरवशाच्या राजकारणामुळं पंतप्रधान होण्याची संधी त्यांच्यापर्यंत आली नाही असं अनेक राजकीय जाणकारांचं मत आहे. 1990 नंतर राष्ट्रीय राजकारणात पवारांएवढा मान कुठल्याच महाराष्ट्रीय राजकारण्याला मिळाला नाही हे वास्तव आहे.
53) पवारांचं संघटनकौशल्य देशातल्या सर्वच लोकनेत्यांना माहित आहे. त्यामुळंच की काय 1993 च्या किल्लारी भूकंपावेळी पवारांनी केलेली तातडीची मदत आणि पुनर्वसन याचं जगभर कौतुक झालं. या कौशल्यामुळंच 2002 च्या भूज भूकंपानंतर पंतप्रधान वाजपेयींनी पवारांवरच पुनर्वसनाची जबाबदारी टाकली होती.
54) पवारांना खावी लागली होती थप्पड शरद पवार युपीएच्या काळात कृषी मंत्री होते. 24 नोव्हेंबर 2011 रोजी पवार एक पत्रकार परिषद आटोपून जाताना अरविंदसिंग नामक व्यक्तीने मागून जात गालावर थप्पड मारली. महागाई व वाढत्या भ्रष्टाचाराचा राग आल्यानं हे केल्याचं तो म्हणाला.
55) सुधाकर नाईकांमुळे पवारांची झाली होती गोची 1991 मध्ये शरद पवार राष्ट्रीय राजकारणात गेले. जाताना त्यांनी सुधाकर नाईकांना महाराष्ट्रात मुख्यमंत्री केले. याच नाईकांनी पवारांविरुद्ध गौप्यस्फोट करुन खळबळ माजवली होती. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या पप्पू कलानींवर कारवाईत थंड घ्या असा पवारांनी सल्ला दिल्याचा नाईकांनी आरोप केला होता.
56) स्टँप ड्युटी घोटाळ्यात पवारांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला. पण हा आरोप घेऊन पवारांविरुद्ध कुठे गुन्हाही दाखल झाला नाही किंवा कोर्टात खटलाही चालला नाही. आरोप कुणालाही सिद्ध करता आला नाही.
57) 2010 साली IPL ला करसवलत मिळण्यात पवारांचा हात असल्याचा आरोप शिवसेना आमदार सुभाष देसाईंनी केला होता. त्याचा खटला हायकोर्टातही चालला. पण पवारांच्या प्रभावामुळं महाराष्ट्र सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सिद्ध झालं नाही.
58) शाहीद बलवाशी संबंधाचा पवारांवर होता आरोप डीबी रिऍलिटीच्या शाहीद बलवाशी पवारांचे संबंध असल्याचा आरोप निरा राडीयांनी केला होता. टू जी स्पेक्ट्रममध्ये स्वॅन टेलिकॉमला पवारांमुळे लायसन मिळाल्याचा त्यांचा आरोप होता. पण हे आरोप करताना आपल्याकडे कागदपत्रे नाहीत असे तिने CBI ला सांगितले.
59) पवारांवर शेकडो आरोप पण सिद्धता शून्य शरद पवारांवर आतापर्यंत भ्रष्टाचाराचे शेकडो आरोप झाले, पण एकही आरोप सिद्ध झाला नाही. विशेष म्हणजे पवारांनी एकाही आरोप करणाऱ्यावर बदनामीचा खटला दाखल केला नाही.
60) लवासाच्या उभारणीवेळी पवारांनी भरपाई मागितल्याचा आरोप होता. लवासा कॉर्पोरेशनमध्ये 2002-2004 दरम्यान सुप्रिया व सदानंद सुळेंचे 20 टक्के मालकी हक्कही होते. नंतर त्यांनी ते विकून टाकले. पवारांच्या प्रभावामुळे लवासाला सरकारी मंजुरी मिळाल्याचाही आरोप होता. पण तो सिद्ध झाला नाही.
61) 2018 मध्ये पवारांनी पुण्यातल्या कार्यक्रमात पुणेरी पगडीऐवजी फुल्यांची पगडी स्विकारली. यामुळं मोठं काहूर झालं. ब्राह्मण समाज नाराजही झाला. पण पवारांनी मला कुणाला विरोध करायचं नाही तर फुले-आंबेडकर-शाहूंचं अनुकरण करायचं आहे असं सांगून सारवासारव केली.
62) पवारांमुळेच ‘घाशीराम कोतवाल ‘ परदेशी रवाना घाशीराम कोतवाल हे 80 च्या दशकात गाजलेलं नाटक शरद पवारांच्या मदतीमुळेच परदेशात होऊ शकलं. कलाकारांना अडवण्याचे नाटक विरोधकांचे प्रयत्न पवारांनी त्यावेळी खुबीनं हाणून पाडले.
63) पवार विज्ञानवादी, पण आवर्जून केली शासकीय पूजा शरद पवार मी विज्ञानवादी आहे असं नेहमी सांगतात. पूजा किंवा आरती करताना त्यांना फारसं कुणी पाहिलं नाही. पण मुख्यमंत्री असताना त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाची शासकीय पूजा आवर्जून केली.
64) पत्नीच्या आग्रहापुढे पवारांचा भीमाशंकरला अभिषेक शरद पवार एकदा भीमाशंकरच्या गेस्टहाऊसमध्ये रात्री झोपलेले असताना पवारांच्या अंगावरून साप गेला. त्यात त्यांना काही इजा झाली नाही. पण पत्नीच्या आग्रहास्तव पवारांनी भीमाशंकरला अभिषेक घातला होता. (NCP Chief Sharad Pawar 80th Birthday Special)
65) पवार घालत होते हनुमानाला अभिषेक काटेवाडी हे शरद पवारांचं मूळ गाव आहे. या काटेवाडीत एक हनुमानाचं मंदिर आहे. शरद पवारांनी तारुण्यातच राजकीय भरारी घेतली होती. त्यावेळी काटेवाडीच्या गावकऱ्यांच्या आग्रहास्तव पवार अनेक वर्षं या हनुमानाला अभिषेक करत होते.
66) मुंबई भूखंडप्रकरणी पवारांविरुद्ध उठले होते काहूर शरद पवार 1987 साली पुन्हा काँग्रेसमध्ये आले आणि 1988 साली ते महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यावेळी मुंबई महापालिकेच्या 285 भूखंडांच्या भ्रष्टाचाराचं प्रकरण खूप गाजलं. जनता दलाच्या मृणाल गोरे आणि शिवसेनेचे त्यावेळचे आमदार छगन भुजबळ यांनीच पवारांना घेरले होते.
67) पवारांनी मागितली होती मृणाल गोरेंची माफी शरद पवार त्यांच्या विरोधकांवर फार टीका करत नाहीत. एखादा वर्मी घाव बसावा असा शब्द वापरुन त्या विरोधकाला सोडून देतात. मुंबईतल्या भूखंड घोटाळ्यावरुन मृणाल गोरेंनी पवारांवर टीकेची झोड उठवली होती. त्यावेळी संतापून पवारांनी त्यांना ‘पुतना मावशी’ म्हंटलं. पण ही चूक लक्षात आल्यावर त्यांनी माफीही मागितली. घोटाळ्याचे आरोप मात्र सिद्ध झाले नाहीत.
68) ‘एकच मूल’ वर पवार पती-पत्नी शेवटपर्यंत ठाम शरद पवार आणि प्रतिभा पवार यांनी लग्नानंतर एकच मूल होऊ देण्याचा निर्णय घेतला होता. 1969 ला त्यांना मुलगी झाली. खरंतर त्या काळात ‘मुलगा हवाच’ अशी समाजाची कर्मठ मानसिकता होती. पण पवार पती-पत्नी आपल्या निश्चयापासून ढळले नाहीत. शरद पवारांनी स्वत: नसबंदी करुन आदर्श घालून दिला.
69) शरद पवार आहेत IPL चे जनक सध्या IPL प्रचंड लोकप्रिय आहे. पण या IPL चे जनक शरद पवार आहेत. ललित मोदींना प्रोत्साहन देऊन त्यांनी ही भारताची T-20 स्पर्धा जगातली सर्वोत्तम स्पर्धा बनवली.
70) पवारांचे क्रीडाप्रेम : क्रिकेट, कुस्ती,कबड्डी,खो खो…. शरद पवार राजकारणात प्रचंड यशस्वी झाले. त्यांना वाचनासह क्रीडा क्षेत्रातल्या मुशाफिरीचाही नाद आहे. कुस्ती, कबड्डी, खो खो आणि ऑलिपिंकच्या महाराष्ट्र संघटनांचे ते अध्यक्ष होते. (NCP Chief Sharad Pawar 80th Birthday Special)
71) MCA च्या अध्यक्षपदाद्वारे पवारांचे क्रिकेटमध्ये पदार्पण देशी क्रीडा प्रकारांसोबत क्रिकेटही पवारांचं आवडतं क्षेत्र आहे. ते स्वतः क्रिकेटपटू होते. त्यांचे सासरेही क्रिकेटपटू होते. मुंबई क्रिकेट संघटनेचं अध्यक्षपद मिळवून पवारांनी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
72) शरद पवार होते 3 वर्षे BCCI चे अध्यक्ष मुंबई क्रिकेटचं अध्यक्षपद भूषवल्यानंतर पवारांनी BCCI मध्ये प्रवेश केला. अध्यक्षपदाच्या पहिल्या निवडणुकीत जगमोहन दालमियांनी त्यांना हरवले, पण पुढे 2005 ते 2008 या काळात BCCIचे अध्यक्ष होते.
73) शरद पवार होते ICC चे सुद्धा अध्यक्ष BCCI चं अध्यक्षपद भूषवल्यानंतर पवारांनी थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला. एकही रणजी किंवा आंतरराष्ट्रीय मॅच न खेळलेले शरद पवार आधी ICC चे उपाध्यक्ष आणि त्यानंतर अध्यक्षही झाले.
74) पवार पुणे मॅरेथॉन, पुणे फेस्टिवलवर पवारांची छाप पुण्यातली आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आणि पुणे फेस्टीवल जगभर प्रसिद्ध आहे. गेल्या 22 वर्षांपासून शरद पवार या मॅरेथॉन ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. मुंबईसह अनेक शहरांच्या स्पर्धा आल्या, पण आंतरराष्ट्रीय स्पर्धकांना अजूनही पुणे मॅरेथॉन खुणावत असते.
75) ऑलिंपिकमध्ये कबड्डीच्या समावेशात पवारांचे योगदान कुस्तीसह कबड्डीवरही पवारांचे मोठे प्रेम आहे. महाराष्ट्र कबड्डी संघटनेचे ते अध्यक्षही होते. 1990 ला बीजिंगमध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत कबड्डीचा समावेश व्हावा यात पवारांनी महत्वाची भूमिका बजावली होती.
76) रोजगार हमीची बीजे पवारांच्या बारामतीत शरद पवार हे अनेक योजनांचे जनक आहेत. 1972 च्या दुष्काळात ‘फूड फॉर हंगर’ घोषणेमुळं पवारांचा स्वाभिमान दुखावला. त्यांनी बारामतीत ‘फूड फॉर वर्कर’ चा प्रयोग केला. पवारांचा हा प्रयोगच रोजगार हमी योजनेची सुरुवात होती.
77) पवारांची कॅन्सरवर जिद्दीनं मात शरद पवारांना तंबाखू आणि गुटखा खाण्याची सवय होती. साठी ओलांडल्यानंतर या व्यवसाने भयाण रुप दाखवले. पवारांना तोंडाचा कॅन्सर झाला होता. पण जिद्दीनं त्यावर मात केली आणि व्यसनालाही रामराम ठोकला.
78) 32 व्या वर्षी पवारांकडून विद्या प्रतिष्ठानची स्थापना शरद पवारांनी वयाच्या 32 व्या वर्षी विद्या प्रतिष्ठानची स्थापना केली. आज ही संस्था पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रकारचे शैक्षणिक अभ्यासक्रम, प्रशिक्षण राबवते. माहिती तंत्रज्ञान व जैवतंत्रज्ञान ही या संस्थेची वैशिष्ट्ये.
79) पवारांच्या नावानेही अनेक शिक्षण संस्था शरद पवार हे श्री गुरुदत्त एज्युकेशन सोसायटीच्या शरद पवार पब्लिक स्कूलशी संबंधित आहेत. शरद पवार इंटरनॅशनल स्कूल आणि मुंबईजवळची शरद पवार क्रिकेट अकादमीसुद्धा पवारांनीच स्थापन केलेल्या संघटना आहेत.
80) रयत शिक्षण संस्थेचे पवार 31 वर्षांपासून अध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटलांनी 1919 साली स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेनं महाराष्ट्र व्यापलाय. साताऱ्याच्या या शिक्षण संस्थेचे शरद पवार हे 1989 पासून म्हणजे 31 वर्षांपासून अध्यक्षपदी आहेत. रयतची राज्यात 70 कॉलेजेस, 500 च्या आसपास शाळा आहेत.
81) शरद पवार आज 81 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. पण एकदाही त्यांच्या तोंडून निवृत्तीचा शब्द आला नाही. आजही ते तरुणाला लाजवेल असं तास न् तास काम करत असतात.रोज पहाटेच उठतात. (NCP Chief Sharad Pawar 80th Birthday Special)
संबंधित बातम्या :