मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून त्यांच्याकडे काही मुद्द्यांवर लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे (Letter of Sharad Pawar to HM Anil Deshmukh). आपल्या पत्रात शरद पवार यांनी पोलीस बंदोबस्तादरम्यान पोलिसांना तासंतास ताटकाळत उभं राहायला लागत असल्याच्या मुद्द्यावर गृहमंत्र्यांचं लक्ष वेधलं आहे. तसेच यासाठी काही उपाययोजना देखील सुचवल्या आहेत.
शरद पवार यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे, “राज्यात मंत्री, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती यांच्या दौऱ्याप्रसंगी गर्दी नियंत्रण, कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त नेमला जातो. जाहीर सभेच्या ठिकाणी मंत्री अथवा अतिमहत्त्वाच्या व्यक्ती यांच्या आगमन आणि प्रस्थानवेळी पोलीस प्रशासनावर विशेष ताण असतो. मात्र, इतरवेळी पोलीस कर्मचाऱ्यांना तासनतास तिष्ठत उभे राहावे लागते. केवळ कर्मचारीच नव्हे तर अशा सभांप्रसंगी पोलीस अधिक्षक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील तिष्ठत उभे राहतात.”
त्यामुळे सभा शांततेत शुरू असताना महिला पोलीस कर्मचारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार बसण्यासाठी खुर्ची अथवा आसन उपलब्ध करून देण्याविषयक संयोजकांना मार्गदर्शक सूचना निर्गमित व्हाव्यात..
Continued (1/2)
— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 13, 2020
बंदोबस्तावेळी पोलीस कर्मचारी-अधिकारी यांनी तत्पर आणि सज्ज असायला हवे. मात्र, सभा सुरळीत चालू असताना पोलीस कर्मचाऱ्यांना निष्कारण त्रास सहन करावा लागतो. यात महिला पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष त्रास होतो, असं मला वाटतं. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही तिष्ठत उभं राहणे उचित वाटत नाही. सभा शांततेत सुरु असताना महिला पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार बसण्यासाठी खुर्ची किंवा इतर आसन व्यवस्था उपलब्द करुन देण्याविषयी आयोजकांना मार्गदर्शक सुचना देण्यात याव्यात. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनाही तशी मुभा द्यावी, असंही शरद पवार यांनी आपल्या पत्रात म्हटलं.
व पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांना गृह विभागामार्फत तशी मुभा असावी, अशी विनंती करणारे पत्र मी महाराष्ट्र राज्याच्या माननीय गृहमंत्र्यांना पाठवले आहे. गृहमंत्री या बाबीकडे वैयक्तिक रीतीने लक्ष देतील, अशी मला अपेक्षा आहे.
(2/2)
— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 13, 2020
‘नेत्यांच्या विलंबाचा पोलिसांवर ताण’
मंत्री अथवा अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्याप्रसंगी रोड बंदोबस्तासाठी देखील पोलीस यंत्रणा तासनतास रस्त्याच्या दुतर्फा तिष्ठत उभी राहिलेली दिसून येते. नियोजित वेळेपेक्षा दौऱ्यास विलंब झाला असता पोलीस कर्मचाऱ्यांवरील ताण असहनीय होतो. रोड बंदोबस्त लावताना वायरलेस आणि इतर संदेश यंत्रणांद्वारे वेळेचे अचून नियोजन व्हावे असं वाटत असल्याचंही शरद पवारांनी आपल्या पत्रात नमूद केलं. अखेरीस त्यांनी अनिल देशमुख यांना राज्याचे गृहमंत्री म्हणून या बाबींकडे वैयक्तिक लक्ष द्याल अशी अपेक्षाही व्यक्त केली.
संबंधित व्हिडीओ: