“होय, मी फडणवीस आणि अमित शाह यांना भेटणार आहे”, एकनाथ खडसे यांची कबुली
भाजपचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंच्या बाबत दोन मोठे दावे केले. त्यावर आता खुद्द खडसे यांनी आपली बाजू मांडली आहे.
रवी गोरे, TV9 मराठी, प्रतिनिधी, मुक्ताईनगर : भाजपचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी राष्ट्रवादीचे आमदार आणि विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसेंच्या बाबत दोन मोठे दावे केले. यानंतर खडसेंच्या घरवापसीची चर्चा होऊ लागली. त्यावर आता खुद्द खडसे यांनी आपली बाजू मांडली आहे. होय मी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अमित शाह यांची भेट घेणार आहे, असं खडसे म्हणालेत. नाशिक मध्ये एका कार्यक्रमात मी देवेंद्र फडणवीस यांची भेट मागितली. ते म्हणाले पुढच्या आठवड्यात मी तुम्हाला कळवतो. मी त्यांना भेटणार आहे, असं खडसे (Eknath Khadse) म्हणाले आहेत.
‘ते’ मी बोललोच नाही
“मी आणि देवेंद्रजी बसलो होतो. तिथे खडसे आले आणि त्यांनी म्हटलं की आपण तिघं बसू. जे काही आहे ते सगळं मिटवून टाकू…”, असं म्हणत महाजनांनी खडसेंबाबत मोठा दावा केला. त्यावर बोलताना मिटून टाका. असं काही मी बोललोच नाही, असं खडसे म्हणालेत.
आता मिटवायचं काय राहिलं? सर्व प्रकारे तर त्रास देण्याचे सुरूच आहेत. ईडी सुरू आहे. सीबीआय सुरू आहे. या सर्व चौकशींना मी समर्थपणे सामोरं जाणार आहे, असं खडसे म्हणालेत.
गिरीश महाजन यांनी म्हटलं की, रक्षाताईंनी मला सांगितलं अमित शहा यांच्या ऑफिसबाहेर तीन तास बसून ठेवलं. भेट झाली नाही. याबाबत रक्षा खडसेंना विचारलं असता कुठलीही चर्चा महाजनसोबत मी केली नाही, असं रक्षा खडसेंनी मला सांगितलं, असंही खडसे म्हणालेत. त्यांच्या या स्पष्टीकरणाने पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे.