दादा वाचून यांचं काय नडतं कुणाला माहीत? दादाला काही खासगी लाईफ आहे की नाही?; अजितदादा भडकले
माझ्याबाबत अशा काही बातम्या इकडं उठवण्यात आल्या. दादा इकडे गेले. दादा तिकडे गेले. दादा नाराज आहेत, दादा अमकं आहेत. काय दादा वाचून यांचं नडतं कुणाला माहिती. दादाला काही खासगी लाईफ आहे की नाही?
पुणे: राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे गेल्या पाच दिवसांपासून मीडियासमोर न आल्याने त्यांच्याबद्दलच्या उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. शिर्डीतील राष्ट्रवादीच्या दोन दिवसीय शिबीराच्या दुसऱ्या दिवशी अजित पवार यांनी दांडी मारली. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू असतानाच खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अपशब्द वापरल्यानंतरही अजितदादा माध्यमांसमोर आले नाही. त्यामुळे अजितदादा नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं. अजितदादांनी आज मावळ येथील कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांच्याबाबतच्या या बातम्यांचा समाचारच घेतला.
तब्बल पाच दिवसानंतर अजित पवार हे सक्रिय झाले. अजितदादा पाच दिवस कुठे होते? ते काय करत होते? ते पक्षात नाराज आहेत का? त्यांनी पाच दिवस मौन का पाळलं होतं? या प्रश्नांची त्यांनी आपल्या खास शैलीत उत्तरे देताना त्यांच्याबद्दल अफवा पसरवणाऱ्यांवरही टीका केली.
मावळ येथील एका कार्यक्रमाला आले असता अजित पवार यांनी अफवांचं खंडण केलं. मी नाराज असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मी पाच दिवस आजारी होतो. मला खोकला लागला होता. त्यामुळे मी लोकांसमोर आलो नाही, असं अजित पवार यांनी सांगितलं.
सहा महिन्यांपूर्वी माझा बाहेरचा दौरा ठरला होता. त्यामुळे मी 4 तारखेला रात्री उशिरा दीड वाजता फ्लाईट पकडून गेलो. काल रात्री उशिरा आलो. पण इथे माझ्याबद्दलच्या काहीही बातम्या सुरू होत्या. गैरसमज निर्माण केला गेला, असं ते म्हणाले.
माझ्याबाबत अशा काही बातम्या इकडं उठवण्यात आल्या. दादा इकडे गेले. दादा तिकडे गेले. दादा नाराज आहेत, दादा अमकं आहेत. काय दादा वाचून यांचं नडतं कुणाला माहिती. दादाला काही खासगी लाईफ आहे की नाही? वरेमाप प्रचार केला. कारण नसताना बदनामी करायची, कारण नसताना गैरसमज निर्माण करायचे, हे बरोबर नाही, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, शिर्डी येथे राष्ट्रवादीचं दोन दिवसीय शिबीर झालं. या शिबिराच्या पहिल्या दिवशी अजितदादांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते शिबिराला आले नाहीत. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं.
त्यानंतर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. त्याचे राज्यभरात पडसाद उमटले. सर्वांनीच या विधानाचा निषेध केला. मात्र, अजित पवार यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली नव्हती.
त्यातच अजित पवार सुट्टीवर आहेत, एवढंच मोघम उत्तर राष्ट्रवादीकडून दिलं जात होतं. त्यामुळे अजित पवार यांच्याविषयीचा संभ्रम वाढत गेल्याने त्यांच्या नाराजीच्या बातम्या वेगाने पसरल्या होत्या.