नाशिक : धुळे नंदुरबार (Dhule Nandurbar) स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या अमरिश पटेल (BJP Leader Amrish Patel) यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. त्यानंतर, अमरिश पटेल यांनी धनशक्तीच्या बळावर मिळवलेला विजय अपेक्षित होताच, अशी टीका राष्ट्रवादीचे धुळ्यातील बडे नेते अनिल गोटे (NCP Leader Anil Gote) यांनी केली. काँग्रेस आणि महाविकास आघाडीची तब्बल 115 मतं फुटल्याने पटेल यांचा विजय सुकर झाला. (NCP Leader Anil Gote says BJP candidate Amrish Patel victory was expected in Dhule Nandurbar Vidhan Parishad Election)
महाविकास आघाडीतील अनेक नेते भाजप उमेदवार अमरिश पटेल यांचे गुलाम आहेत. त्यामुळे अमरिश पटेल यांचा विजय अपेक्षित होताच. अमरिश पटेल धनशक्तीच्या जोरावर निवडून आले. अमरिश पटेल जरी भाजपात असले तरी धुळ्यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस हे पक्ष चालवतात. 50 हजार ते 1 लाखाचा भाव होता, असा घणाघाती आरोप गोटेंनी केला. महाविकास आघाडी राज्यात चांगलं काम करत आहे, मात्र धुळ्यात बोगस कारभार सुरु आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पैशांचा वापर सर्रास केला जात असल्याचा दावाही त्यांनी केला.
अमरिश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांचा पराभव केला. पटेल यांना 332, तर अभिजीत पाटील यांना 98 मतं मिळाली. त्यामुळे अमरिश पटेल यांनी 234 मतांनी बाजी मारली. अमरिश पटेल यांचा या मतदारसंघातील सलग तिसरा विजय आहे. यापूर्वी त्यांनी 2009, 2015 आणि आता 2020 मध्ये विजय मिळवला.
कोण आहेत अनिल गोटे?
धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी गेल्या वर्षी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. सध्या अनिल गोटे यांच्याकडे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्षपद आहे.
अनिल गोटे यांनी भाजपमध्ये असताना शरद पवारांवर नेहमीच टोकाची टीका केली होती. तेलगी स्टॅम्प घोटाळाप्रकरण असो वा कोणताही विषय, अनिल गोटे आणि शरद पवार यांच्यातील वाकयुद्ध राज्याने पाहिलं. तेलगी प्रकरणानंतर गोटे आणि पवार यांच्यात संघर्ष वाढला होता, गोटेंनी पवारांवर आतापर्यंत विखारी टीका केली होती.
काँग्रेसचं क्रॉस व्होटिंग पटेलांच्या पथ्यावर
अमरिश पटेल यांना भाजपची मतं तर मिळालीच, मात्र काँग्रेस आणि महाविकास आघाडीची तब्बल 115 मतं फुटली. आकड्यातच सांगायचं तर भाजपची 199 आणि महाविकास आघाडीची 213 इतकी मतं होती. मात्र महाविकास आघाडीच्या 115 मतदारांचे क्रॉस व्होटिंग झाले.
अभिजीत पाटील यांना अवघी 98 मतं मिळाली, तर भाजपचे अमरिश पटेल तब्बल 332 मतं मिळवून विजयी झाले. अमरिश पटेलांच्या या विजयाने महाविकास आघाडीच्या एकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
धुळे- नंदुरबार निवडणुकीतील संख्याबळ
अमरिशभाई 12 महिन्यांसाठी आमदार
अमरिश पटेल हे मूळचे काँग्रेसचे. मात्र त्यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपमध्ये प्रवेश केला. त्यापूर्वी त्यांना विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला. अमरिश पटेल यांनी 30 सप्टेंबर 2019 रोजी राजीनामा दिल्यामुळे, विधानपरिषदेची त्यांची जागा रिक्त झाली. खरं तर अमरिश पटेल यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांचा कार्यकाळ 14 डिसेंबर 2021 पर्यंत होता. पण राजीनाम्यामुळे पुन्हा निवडणूक लागली. ही निवडणूक मार्च 2020 मध्ये नियोजित होती, पण कोरोना संकटामुळे ती पुढे ढकलली. ही निवडणूक डिसेंबर 2020 मध्ये पार पडली आणि केवळ 12 महिन्यांसाठी निवडणूक लागली.
या निवडणुकीत जो उमेदवार विजयी होईल तो केवळ 12 महिन्यांसाठीच आमदार होईल हे निश्चित होतं. मात्र अमरिश पटेल यांनी पुन्हा दावेदारी दाखल करुन उरलेल्या 12 महिन्यांसाठीही आपणच आमदार असू, हे सिद्ध केलं.
अमरिश पटेल यांचा तिसरा विजय
अमरिश पटेल यांनी पहिल्यांदा 2009 मध्ये बिनविरोध विजय मिळवला होता. मग 2015 मधील विधानपरिषद निवडणुकीत अमरिश पटेल हे 321 मतांनी विजयी झाले. त्यानंतर 2020 च्या पोटनिवडणुकीत अमरिश पटेल यांनी 234 मतांनी विजय मिळवून आपली ताकद दाखवून दिली.
अमरिश पटेल यांची कारकीर्द
अमरिश पटेल हे उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे महत्वपूर्ण नेते होते. त्यांनी मंत्रिपदही भूषवले होते. धुळे नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसच्या निर्णय प्रक्रियेत त्यांना महत्त्वपूर्ण स्थान होते. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला.
VIDEO | विजयानंतर अमरिश पटेल काय म्हणाले ?
संबंधित बातम्या
अमरिश पटेल – विजयाची हॅटट्रिक, तरीही 12 महिन्यांसाठी आमदार!
(NCP Leader Anil Gote says BJP candidate Amrish Patel victory was expected in Dhule Nandurbar Vidhan Parishad Election)