शरद पवार यांना सोडून गेलेल्यांचं काय होतं?, बाबाजानी दुर्रानी यांचं सर्वात मोठं विधान; सूचक इशारा कुणाला?
"कुछ तो मजबुरीया रही होंगी, वरना युंही कोई बेवफा नहीं होता", ही शायरी त्यांनी ऐकवली. त्यापुढे त्यांनी पण माझी अशी काही मजबुरी नव्हती, असे सांगितले.
Babajani Durrani Enter Sharad Pawar Party : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाबाजानी दुर्राणी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश घेतला. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि बाबाजानी दुर्राणी यांचा मुलगा जुनैद दुर्राणी यांची काल भेट झाली होती. बाबाजानी दुर्राणी यांचा मुलगा जुनैद दुर्राणी शरद पवार गटाच्या बैठकीत सहभागी झाले. तिथे त्यांनी आपल्या वडिलांसाठी विधानसभेचं तिकीटही मागितलं होतं. यानंतर आज बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना परभणीत सर्वात मोठा धक्का बसला आहे.
शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर बाबाजानी दुर्राणी यांनी मंचावर भाषण केले. यावेळी बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवार यांना सोडून गेलेल्यांचं काय होतं, याबद्दल मोठं विधान केले. या भाषणाला सुरुवात करतेवेळी बाबाजानी दुर्राणी यांनी एक शायरी ऐकवली. “कुछ तो मजबुरीया रही होंगी, वरना युंही कोई बेवफा नहीं होता”, ही शायरी त्यांनी ऐकवली. त्यापुढे त्यांनी पण माझी अशी काही मजबुरी नव्हती, असे सांगितले.
“बरं झालं साहेब मी शून्य होण्याच्या आधीच आलो”
“मी साहेबांच्या नेतृत्वाखाली १९८० पासून काम करीत आलो. साहेबांचं चरखा हे पक्षचिन्ह असण्यापासून घड्याळाचं चिन्हं असेपर्यंत मी त्यांच्यासोबत काम केले आहे. मराठवाड्यात फक्त तीन नगरपालिका होत्या. पात्री, पारतूर, उस्मानाबाद या तीन नगरपालिका होत्या. तेव्हापासून पात्रीतील नगरपालिका ही माझ्या नेतृत्वाखालीच आहे. पंचायत समिती, मार्केट कमिटी, जिल्हा परिषदेवरही आम्ही १० वर्षे राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परभणी जिल्ह्यात खूप मोठी ताकद आहे. पक्ष फुटला. त्यानंतरही मी दोन महिन्यांनी काही कारणात्सव, काही लोकांच्या सांगण्यावरुन मी सोडून गेलो. पण मी एवढंच सांगेन की साहेबांना सोडून गेलेली अनेक लोक मी माझ्या जीवनात पाहिले, ते पुन्हा विधानभवनाच्या परिसरात दिसले नाही. ते शून्य झाले. बरं झालं साहेब मी शून्य होण्याच्या आधीच आलो”, असे बाबाजानी दुर्राणी यांनी म्हटले.
ही लोकांची मानसिकता होती
आज लोकसभेच्या निवडणुकीत मी देशाचे चित्र पाहिले. जे कोणी जातीवाद करणारे पक्ष, भाजपसोबत गेले किंवा इतर पक्षासोबत गेले, लोकांनी त्यांना शून्य केले. ही लोकांची मानसिकता होती, असेही बाबाजानी दुर्राणी यांनी सांगितले.
बाबाजानी दुर्राणी कोण?
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बाबाजानी दुर्राणी हे अजित पवारांसोबत आले. त्यांची नुकतीच विधान परिषदेच्या आमदारकीची टर्म संपलीय. पुन्हा त्यांनी विधान परिषदेचं तिकीट मागितलं होतं. पण पुन्हा अजित पवारांकडून त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांकडे परतण्याचा निश्चय बाबाजानी यांनी केल्याचं दिसतंय. बाबाजानी दुर्राणी 2004 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर आमदार झाले होते. त्यानंतर 2012 आणि 2018 मध्ये शरद पवारांनी त्यांना विधान परिषदेवर आमदार केलं.