अमिताभ बच्चन, शाहरुख खान मुंबई सोडणार होते… छगन भुजबळ यांचा नेमका दावा काय?
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्री पद न मिळाल्याने आपली जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.आता ते कार्यकर्त्यांच्या भूमिका जाणून घेण्यासाठी येवला येथे पोहोचले आहेत. त्यांनी यावेळी आपण पवारांच्या सोबत काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन करताना मी पवारांच्या सोबत कसे काम केले याचे दाखले दिले.
महायुतीचे सरकार स्थानापन्न झाले आहे. परंतू मंत्रीपदाची वाटणी करताना अनेक दिग्गजांना घरचा रस्ता दाखविलेला आहे. यात राष्ट्रवादीतून ज्येष्ट नेते छगन भुजबळ यांनाही मंत्रीपदापासून दूर ठेवल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. आपण कार्यकर्त्यांशी नाशिक येथे बोलल्यानंतर पुढचा निर्णय घेणार असल्याचे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलेले आहे. या संदर्भात छगन भुजबळ यांनी येवला येथे बैठक घेऊन आपली बाजू प्रसारमाध्यमांसमोर मांडली आहे. छगन भुजबळ यांनी अजितदादांवर आपला राग उघडपणे व्यक्त केलेला आहे. त्यांनी आपण जरांगे यांना अंगावर घेतल्याने महायुतीला ओबीसींची मते मिळाल्याचे म्हटले होते. आज त्यांनी आपल्या मनातील खदखद सर्वासमोर मांडली आहे.
आपण सगळे एकजुटीने काम करूयात कोणाविषयी राग ठेवायचा नाही. अडीअडचणीच्या काळात विरोधकांना मदत करायची. ज्यांनी आपलं काम नाही केलं आपण त्यांचं काम करायचं असे छगन भुजबळ यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की आरक्षणाचा भुलभुलय्या संपणार आहे. काही लोकांनी अजित दादांना धन्यवाद दिले आहेत. कारण मला मंत्री केलं नाही. मंत्रिपदं अनेकदा मिळाली आहेत. त्यामुळे आता नाही भेटलं, त्याचा काय वाद नाही असेही भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
सुरुवातीलाच महसूल मंत्री झालो
आपण सुरुवातीलाच महसूल मंत्री झालो होतो. आता महसुलमंत्री पदावरुन पक्षांमध्ये भांडणं सुरू आहेत असे भुजबळ यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की विरोधी पक्षनेता झालो त्यावेळी पवारांच्या अपेक्षेपेक्षा जास्त काम केले होते. 1999 साली जर काँग्रेस एकत्र असती तर मी 100 टक्के मुख्यमंत्री झालो असतो असेही ते म्हणाले. मला सोनिया गांधी यांच्यापासून अनेकांचे फोन होते की तुम्ही काँग्रेस सोडू नका, तुम्हाला मुख्यमंत्री करणार आहोत, पण मी पवारांच्या सोबत गेलो असा आपला राष्ट्रवादीचा प्रवास सांगताना ते म्हणाले.
मुंबईतली दहशत संपवली
राष्ट्रवादी स्थापन झाली तेव्हा कोणाचा पत्ता नव्हता फक्त मी आणि पवार साहेब होतो. जेव्हा मुंबईत दहशतखाली होती, लोक दाऊदचं नाव घ्यायला घाबरत होते. तेव्हा मी गृहमंत्री झालो होतो. बच्चन , शाहरुख मुंबई सोडून जाणार होते मी त्यांना थांबवलं आणि मुंबईतली दहशत संपवली असेही भुजबळ यांनी सांगितले. आपण लढायचं असतं घाबरून जायचं नसतं.आमदारांचे घरं पेटवली तेव्हा माझी लढाई सुरू झाली. मग मी राजीनामा दिला होता. पोलीस हतबल झाले होते म्हणून मी पुढे येण्याचा निर्णय घेतला असेही भुजबळ यांनी मराठा आणि ओबीसींच्या लढाई संदर्भात सांगितले.