मला एवढा संघर्ष करावा लागतो, तर सामान्यांना किती संघर्ष करावा लागत असेल- खडसे
खडसेंनी चक्क पोलीस स्टेशनमध्ये रात्रभर का दिला ठिय्या? पोलीसांविरोधात खडसेंनी का व्यक्त केला संताप?
अनिल केऱ्हाळे, TV9 मराठी, जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी गुरुवारी रात्रभर जळगाव पोलीस स्टेशनमध्येच (Jalgaon Police Station) ठिय्या दिला. पोलिसांनी गुन्हा (Police Complaint) दाखल करुन घेण्याची खडसेंची मागणी मान्य न केल्यानं खडसे आक्रमक झाले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे अखेर एकनाथ खडसे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पोलीस स्थानकातच ठिय्या आंदोलन केलं.
जिल्हा दूध संघात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप खडसेंनी केला आहे. या गैरव्यवहाराची चौकशी झाली पाहिजे, अशी खडसेंची मागणी होती. जिल्हा दूध संघाच्या गैरव्यवहार प्रकरणाविरोधात खडसेंनी आक्रमक पवित्रा घेतलाय. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची खडसेंची मागणी आहे.
याच मागणीसाठी खडसेंनी जळगाव पोलीस स्टेशन गाठलं. पण तिथं पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे आपल्यालाच जर इतका संघर्ष करावा लागत असेल, तर सर्वसामान्य माणसाला किती संघर्ष करावा लागत असेल, असं त्यांनी म्हटलं.
‘चोरी झाली म्हणून तुम्ही पोलिसांकडे गेलात आणि पोलीस जर तक्रारच नोंदवून घेत नसतील, तर काय करायचं? पोलीसच जर असं वागत असतील तर सर्वसामान्य माणसाला कसा न्याय मिळणार?’, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कायदा सुव्यवस्था खरंच जिवंत आहे का, असा प्रश्नही त्यांनी विचारला.
जिल्हा दूध संघात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा खडसेंचा आरोप आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केल्यानं खडसेंनी 9 तास ठिय्या दिला. त्यानंतर अखेर पोलिसांनी खडसेंची विचारपूस केली आणि तक्रार नोंदवून घेतलीय. आता 9 दिवसांनंतर एफआयर दाखल करतील, असा टोलाही त्यांनी लगावलाय. ते टीव्ही 9 मराठीसोबत बोलत होते.