चक्क राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याकडून पाठराखण? म्हणाले- पंकजा मुंडेंच्या वक्तव्याचा ‘तसा’ अर्थ काढू नका
पंकजा मुंडे यांनी एका वक्तव्यातून थेट पंतप्रधान मोदी यांनाच आव्हान दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे, एकनाथ खडसेंनी पंकजा मुंडे यांना नेमकं काय म्हणायचंय ते अधिक स्पष्ट करून सांगितलं.
जळगावः भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केलेल्या वक्तव्यावर चक्क राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्याने पाठराखण केली आहे. मी पक्षाशी प्रामाणिक असेल तर मोदीजीही (PM Narendra Modi) मला पराभूत करू शकणार नाहीत, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं. यावर राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे (Eknath khadse) यांनी पंकजा यांची भावना अधिक स्पष्ट करून सांगितली. ते म्हणाले, ‘ अनेक वर्ष मी प्रामाणिकपणे केलं असेल तर मला कुणीही पराभूत करू शकणार नाही, अशी त्यांची भावना असेल. कदाचित मोदींचं नाव त्यांनी कोणत्या अर्थाने घेतलं, हे मला सांगता येत नाही. मोदींना आव्हान दिलं असेल तर ते दुर्दैवी आहे. मोदींना आव्हान दिलं नसेल. त्याचा अर्थ तसा घेतलाही जाऊ नये, अशी प्रतिक्रिया पूर्वीचे भाजपाचे नेते आणि आता राष्ट्रवादीत असलेले एकनाथ खडसे यांनी केलंय.
पंकजांनी अनेकवेळा वरिष्ठांवर नाराजी व्यक्त केली तरी त्या प्रामाणिकपणे आपलं काम करतायत, असं वक्तव्य खडसे यांनी केलं. पंकजांच्या वक्तव्याची पाठराखण एकनाथ खडसेंनी कशी केली, यावरून सध्या राजकीय चर्चा सुरु आहेत.
एकनाथ खडसे काय म्हणाले पहा..
कुठे बोलल्या पंकजा मुंडे?
सध्या नवरात्र उत्सव सुरु आहे. त्यामुळे वेगवेगळे नेते आपापल्या जिल्ह्यांतील देवीच्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. बीड जिल्ह्यातील एका नवरात्र मंडळात पंकजा मुंडे यांचं भाषण होतं. यावेळी त्यांनी भाजप पक्षात घराणेशाहीला महत्त्व नाही, असं वक्तव्य केलं.
नेमकं काय म्हणाल्या?
घराणेशाहीवर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, मलादेखील राजकीय वारसा आहे. पण कुणा वारशाच्या मदतीने मी राजकारण करते, असं म्हणणार नाही. मोदींना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. मी पण वंशवादाचं प्रतीक आहे. मोदीजीही मला संपवू शकणार नाहीत. कारण मी तुमच्या मनावर राज्य केलेलं आहे.
पहा पंकजा मुंडेंचं वक्तव्य…
पंकजा मुंडे यांनी या वक्तव्याद्वारे थेट पंतप्रधान मोदी यांनाच आव्हान दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.