‘साप साप म्हणून भूई थोपटणं गरजेचं नाही’, पूजा चव्हाण प्रकरणात जयंत पाटलांची प्रतिक्रिया

| Updated on: Feb 15, 2021 | 6:09 PM

पूजा चव्हाण प्रकरणात मंत्री संजय राठोड यांची नियमानुसार चौकशी केली जाईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिलीय.

साप साप म्हणून भूई थोपटणं गरजेचं नाही, पूजा चव्हाण प्रकरणात जयंत पाटलांची प्रतिक्रिया
Follow us on

सांगली : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात शिवसेनेते मंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. भाजपकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करुन कारवाईची आक्रमक मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांची नियमानुसार चौकशी केली जाईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिलीय. साप साप म्हणून भूई थोपटणं आवश्यक आहे असं आपल्याला वाटत नसल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय.(NCP leader Jayant Patil’s reaction in Pooja Chavan’s death case)

“मागच्या दोन घटनांमध्ये असं लक्षात आलं आहे की, जे आरोप झाले ते तथ्यहीन होते. आता होणाऱ्या आरोपांचाही खरे खोटेपणा तपासला जाईल. जर कुणी चुकीचं केलं असेल, दोषी असेल तर त्यात योग्य ती कारवाई होईलच. पण साप साप म्हणून भूई थोपटणं आवश्यक आहे असं आपल्याला वाटत नाही”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी म्हटलंय. त्यामुळे संजय राठोड यांच्यावर होणाऱ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मंत्रीही त्यांच्या पाठीशी उभे राहत असल्याचं पाहायला मिळत आहे.

गृहमंत्री काय म्हणाले?

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तब्बल 8 दिवसानंतर मौन सोडलं आहे. पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिसांवर कोणताही दबाव नाही. पोलीस चांगला तपास करत आहेत. पोलिसांवर दबाव असलेला विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. त्यात काहीच तथ्य नाही. चौकशी अहवाल आल्यावर सत्य निष्पन्न होईल, असं देशमुख यांनी सांगितलं. पूजा चव्हाण प्रकरणी राठोड यांचा राजीनामा घेऊन नंतरच त्यांची चौकशी करावी, अशी मागणी विरोधक करत आहेत. त्यावर बोलताना राठोड यांची नियमानुसार चौकशी केली जाईल. चौकशीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार त्याबाबतचा निर्णय घेईल, असं देशमुख यांनी स्पष्ट केलं.

ही पूर्णपणे आत्महत्या : धनंजय मुंडे

पूजा चव्हाणची हत्या नाही, तर पूर्णपणे आत्महत्या आहे. या प्रकरणात अनेक गोष्टी समोर येत आहेत. मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. चौकशीत सत्य समोर येईल त्यानंतर अधिक बोलता येईल, असंही धनंजय मुंडेंनी सांगितलं. त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

संबंधित बातम्या :

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सत्य का लपवताय? ठाकरे सरकारला फडणवीसांचा सवाल

पूजा चव्हाण मृत्यू | संजय राठोड दक्षता घेत असावेत, योग्य वेळी बोलतील, शिवसेनेची प्रतिक्रिया

NCP leader Jayant Patil’s reaction in Pooja Chavan’s death case