एकनाथ खडसे- अमित शहांची भेट की फोन? राष्ट्रवादीचा मोठा खुलासा, काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर विधानपरिषदेचे पद आणि पक्षाच्या संदर्भात काही महत्वपूर्ण जबाबदाऱ्या देखील नाथाभाऊंकडे देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे हा विषय चुकीचा आहे,अशी काही परिस्थिती नाही, असं महेश तपासे यांनी स्पष्ट केलं.
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पूर्वाश्रमीचे भाजप नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) पुन्हा भाजपात जाण्याच्या चर्चा सुरु आहेत. एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे यांनीदेखील अमित शहांशी त्यांचं फोनवर बोलणं झाल्याचा खुलासा केला. त्यामुळे एकनाथ खडसे हे अमित शहांना (Amit Shah) भेटल्याची चर्चा आहे. मात्र ही भेट झालेली नाही. पण एकनाथ खडसे लवकरच अमित शहांची भेट घेणार आहेत, असंही राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलंय. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी या गोष्टीवर सविस्तर खुलासा केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि एकनाथ खडसे यांची प्रत्यक्ष भेट झाली नसली तरीही फोनवर चर्चा झालेली आहे, असं तपासे यांनी सांगितलं.
अमित शहांना भेटणार?
महेश तपासे म्हणाले, सन्माननीय दादाभाऊ एकनाथ खडसे साहेब, भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याची चर्चेची आहे ती पूर्णपणे चुकीची आहे. ज्या गृहमंत्र्यांच्या भेटीच्या संदर्भातली ती बातमी आ, हे ती भेट झालेली नाही पण फोनवर चर्चा झालेली आहे …
अमित शहांच्या भेटीसंदर्भाचा संपूर्ण विषय नाथाभाऊंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सांगितलेला आहे. तसेच शरद पवार यांच्याच उपस्थितीत एकनाथ खडसे अमित शहांची भेट घेणार आहेत, असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केलं.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी एकनाथ खडसे एकटे जाणार नाहीत तर शरद पवार यांना सोबत घेऊन जाणार आहेत, असा तो विषय असल्याचं महेश तपासे यांनी खुलाशात सांगितलं.
महेश तपासे आणि खडसे दोघांचीही वक्तव्य ऐका…
एकनाथ खडसे यांनी या संदर्भामध्ये खुद्द खुलासा देखील केलेला आहे. राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर विधानपरिषदेचे पद आणि पक्षाच्या संदर्भात काही महत्वपूर्ण जबाबदाऱ्या देखील नाथाभाऊंकडे देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे हा विषय चुकीचा आहे,अशी काही परिस्थिती नाही, असं महेश तपासे यांनी स्पष्ट केलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाविषयीच्या चर्चांवर विचारले असता, त्यांनी यावर बोलणं टाळलं. मला याबद्दल काहीही माहिती नाही, असं उत्तर त्यांनी माध्यमांना दिलं.