भंडारा – राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांच्यावर ईडीची (ED) कारवाई करण्यात आली आहे. मुंबईतील (Mumbai) त्यांच्या सीजे हाऊसमधील बेनामी संपत्ती जप्त करण्यात आली. इक्बाल मिर्चीप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. या सर्वांमुळे मात्र प्रफुल पटेल यांचे समर्थक चांगलेच दुखावले गेल्याचे पाहायला मिळत आहे. प्रफुल पटेल यांची नाळ भंडारा गोंदिया जिल्ह्याशी लहानपणापासून जुळली आहे. इथे त्यांचे अनेक समर्थक आहेत. जिल्ह्यातील तुमसर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व प्रफुल्ल पटेल यांचे समर्थक सागर गभने व यासिन छवारे यांनी एका मराठी सिनेमातील गाण्याच्या ओळी बॅनरवर छापून प्रफु्ल्ल पटेल यांना भावनिक समर्थन दर्शविणारे शहरात बॅनर लावले आहेत. या बॅनरच्या माध्यमातून त्यांनी प्रफुल पटेल यांना भावनिक साद देत समर्थन दिले आहे.
बॅनरवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी असे लिहिले आहे की, ‘भाजप सरकारने ED व दबाव तंत्राचा वापर करून वाघाला पिंजऱ्यात अडकवण्याचा निष्फळ प्रयत्न केला आहे. पण ज्याला देव तारी त्याला कोण मारी, हिम्मत ठेवा भाईजी देव तुमच्या पाठीशी आहे आणि आम्ही भंडारा-गोंदिया जिल्हयाचे नागरीक तुमच्या सोबत आहोत’ अश्या प्रकारचे बॅनर सध्या तुमसर शहरात झळकताना दिसत आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे.
ईडीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या मालकीच्या व्यावसायिक इमारतीचे चार मजले आहेत. गँगस्टर दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी इक्बाल मिर्ची याच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणातील व्यवहारासंदर्भात प्रफुल्ल पटेलवर ईडीने ही कारवाई केली आहे. वरळीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या व्यावसायिक इमारतीवर ही कारवाई करण्यात आली आहे. वरळीत सीजे हाऊस ही मोठी इमारत आहे. ही इमारत बांधण्यापूर्वी तेथे एक छोटी इमारत होती. इमारतीचा मालक गुंड इक्बाल मिर्ची होता. इक्बाल मिर्चीच्या कुटुंबाला दिलेले सीजे हाऊसचे दोन मजले यापूर्वी आर्थिक तपास यंत्रणेने जोडले होते.