रायगडमध्ये सुनिल तटकरेंना मोठा धक्का, कट्टर समर्थकाचा शिवसेनेत प्रवेश
राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि माजी उर्जामंत्री सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांना रायगडमध्ये (Raigad) मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान जिल्हाध्यक्ष आणि सुनिट तटकरेंचे कट्टर समर्थक प्रमोद घोसाळकर (Pramod Ghosalkar) यांनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला.
रायगड: राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि माजी उर्जामंत्री सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांना रायगडमध्ये (Raigad) मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान जिल्हाध्यक्ष आणि सुनिट तटकरेंचे कट्टर समर्थक प्रमोद घोसाळकर (Pramod Ghosalkar) यांनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्वतः घोसाळकर यांच्या हातात शिवबंधन बांधले. यावेळी म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, दादा भुसे, अर्जुन खोतकर हेही मातोश्रीवर उपस्थित होते.
राष्ट्रवादीच्या प्रमोद घोसाळकरांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा हादरा बसला आहे. या पक्षांतराने सुनिल तटकरेंच्या जिल्ह्यातील वर्चस्वालाही धक्का बसण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांचा पुतण्या आणि श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे (Avadhut Tatkare) यांनी देखील राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच अवधूत तटकरे हातात ‘शिवबंधन’ बांधणार आहेत. यामुळे राष्ट्रवादीसोबतच तटकरे कुटुंबालाही भगदाड पडलं आहे. सुनिल तटकरेंचे बंधू अनिल तटकरे यांचे पुत्र अवधूत तटकरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत सार्वजनिकपणे नाराजी व्यक्त केली. गेल्या काही दिवसांपासून अवधूत यांच्या ‘मातोश्री’वर वाऱ्या सुरू होत्या.
सुरुवातीला, केवळ सदिच्छा भेट असल्याचं सांगणाऱ्या अवधूत तटकरे यांनी राजकीय चर्चा झाल्याचं मान्य केलं. कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय जाहीर करणार असल्याचं अवधूत आधी म्हणाले होते. पण त्यानंतर अवधूत तटकरे सेनेत प्रवेश करणार असल्याचं वृत्त आलं.
राष्ट्रवादीला भगदाड
याआधीच अनेक आमदार सोडचिठ्ठी देऊन युतीच्या वळचणीला गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खिळखिळा झाला आहे. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आणखी एक आमदार शिवसेनेच्या गळाला लागला आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरु असतानाच तटकरे कुटुंबीयांसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
काय आहे वाद?
अवधूत तटकरे आणि सुनील तटकरे यांचे संबंध तणावाचे असल्याचं बोललं जातं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः तटकरे कुटुंबीयांच्या या भांडणात हस्तक्षेप करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पवारांच्या प्रयत्नांनाही फार यश आलं नाही. 2016 मध्ये अवधूत तटकरेंच्या धाकट्या भावाने शिवसेनेत प्रवेश केला होता.
सुनील तटकरे यांची कन्या अदिती तटकरे आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अवधूत यांनी स्वतःची तयारी सुरु केली असल्याचं दिसत आहे. याआधी खासदार सुनिल तटकरेही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र तटकरेंनी हे दावे फेटाळून लावले होते.