अमित शाहांची सोलापुरात शरद पवारांवर टीका; आता नातवाचं शाहांना उत्तर
भाजपचे (BJP) अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी (Amit Shah) राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवारांना विचारलेल्या प्रश्नावर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट टाकत भाजप डबल ढोलकी असल्याची घणाघाती टीका केली.
बारामती : भाजपचे (BJP) अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी (Amit Shah) राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवारांना विचारलेल्या प्रश्नावर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट टाकत भाजप डबल ढोल असल्याची घणाघाती टीका केली. गरज पडली की सल्ला घ्यायचा, बारामतीत येवून कौतुक करायचं आणि निवडणुका आल्या की काय केलं विचारायचं. हा भाजपचा नेहमीचा डबल ढोल वाजवण्याचा प्रकार असल्याची टीका रोहित पवार यांनी केली.
रोहित पवार म्हणाले, “शरद पवारांचं राजकारण म्हणजे कुणीही उठावं आणि बोट दाखवावं असं निश्चितच नाही. गेल्या 50 वर्षात तीन पिढ्यांनी पाहिलेलं हे राजकारण आहे. त्यांच्यामुळे शेतकऱ्याने शेतीतून चार पैसे कमावले. त्यांच्या मुलाने तालुक्याच्या ठिकाणी चांगले शिक्षण घेवून नोकरी केली. त्याचा नातू आज IT कंपनीत नोकरी करु शकतो. अशाप्रकारे शरद पवारांच्या राजकारणाची शृंखला शेतीपासून ते IT पार्क उभा करण्यापर्यंतची आहे.”
गरज पडली की शरद पवारांचा सल्ला घ्यायचा, बारामतीत येवून शरद पवारांचं कौतुक करायचं आणि निवडणुकीची वेळ आली की पवारांनी काय केलं हे विचारायचं. हा भाजपचा नेहमीचाच डबल ढोलसारखा प्रकार आहे. डबल ढोल दोन्हीकडून वाजतो. तसंच समोरच्या पक्षाचं राजकारण डबल ढोलप्रमाणे वाजत असतं. पण आत्ता बास झालं, असंही रोहित पवार यांनी नमूद केलं.
‘जातीपातीत धर्माधर्मात भांडण लावणारा नाही, तर माणसं जोडणारा इतिहास’
रोहित पवार पुढे म्हणाले, “शरद पवारांच्या राजकारणाचा प्रवास महिलांना समान संधी निर्माण करण्यापासून उपेक्षित आणि दिनदुबळ्या लोकांच्या पाठीमागे उभा राहण्याचा आहे. प्रसंगी राजकारणाची तडजोड न करता त्यांनी वंचित आणि अल्पसंख्याक समाजासाठी घेतलेले निर्णय उभा महाराष्ट्र जाणतो. त्यांचा इतिहास जातीपाती, धर्माधर्मात भांडण लावणारा नाही तर माणसं जोडणारा आहे.”
‘आता जमिनच नांगरायची वेळ आली’
सामान्य माणूस शरद पवारांच्या सोबत आहे. घरात आमदारकीपासून खासदारकी आलेले नेतेमंडळी कुंपणावरून उड्या मारण्यात आघाडीवर आहेत. मध्यंतरी पीठ बदलण्याची भाषा आपण केली होती. जाड भरडं पीठ पण दूसऱ्या पक्षात गेलं. आत्ता जमिनच नांगरायची वेळ आली आहे. चांगली मशागत करुन ठेवुया, असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीच्या पुढील वाटचालीविषयी भाष्य केलं. तसेच ही नांगरणी कधी, कुठे आणि कशी करायची हे लवकर ठरवूयात, असंही कार्यकर्त्यांना सांगितलं.
महाराष्ट्राच्या मातीत यशवंतराव चव्हाणांनी रुजवेलेली विचारांची आणि विकासांच्या राजकारणाची श्रृखंला आहे. थोरामोठ्यांच्या आशिर्वांदाने आपणा तरुणांनाच ही पुढे घेवून जावी लागणार आहे, हे लक्षात ठेवा, असंही त्यांनी कार्यकर्त्यांना बजावलं.