मुंबई : राज्यात घडामोडींना वेग आला आहे. अश्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांना राष्ट्रवादी (NCP) भाजप (BJP) सोबत जाणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तेव्हा शरद पवार मिश्किल हसले. अन् म्हणाले “सेन्सिबल प्रश्न विचारा…”
सध्या राज्यात राजकीय अस्थिरता पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे पक्षावर नाराज आहेत. शिवाय राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत जायचं नाही. भाजपसोबतच युती करायची असा प्रस्ताव शिंदे यांनी उद्धव ठाकरेंसमोर ठेवला. अश्यात 2019 च्या पहाटेच्या शपथविधी अनेकांना आठवला. त्यामुळे राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का? असा सवाल विचारण्यात आला. त्यावर शरद पवार मिश्किल हसले. “संवेदनशील प्रश्न विचारा…” , असं शरद पवार म्हणालेत.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. मात्र शिवसेनेत सुरु झालेली बंडखोरी हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. ते म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी व शिवसेना आम्ही तिघे सोबत आहे. पण एक्झॅटली काय मुद्दा आहे. तो प्रॉब्लेम कसा सोडवायचा हे शिवसेनेकडून कळवलं जात नाही. त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही. आज दुपारी आम्ही डेप्थ स्टडी करू. त्यानंतर संध्याकाळी बोलू असा मला शिवसेनेकडून निरोप आला आहे. आमच्या तिन्ही पक्षात समन्वय आहे. शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद आहे. उपमुख्यमंत्रीपद आमच्याकडे आहे. इतर मंत्रालये काँग्रेसकडे आहेत. शिवसेनेने काही करणं किंवा कुणाला संधी देणं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. शिवसेना कुणाला काही देत असेल तर आम्ही शिवसेनेच्या निर्णयाला पाठिंबा देऊ. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकार चालवलं आहे. त्यामध्ये काही बदल करण्याची आम्हाला गरज वाटत नाही.