“मी पहिला अंक दिल्लीत इंडियन एक्सप्रेस वाचतो. नंतर इतर वाचतो. महाराष्ट्रात पहिला पेपर लोकसत्ता वाचतो. नंतर पुण्यनगरी, सकाळ इतर अंक वाचतो. पूर्वी अग्रलेखांवर अंक खपायचे. आता तंत्रज्ञान बदललं आहे. पूर्वीचं तंत्रज्ञान वेगळं होतं” असं शरद पवार म्हणाले. पुणे श्रमिक पत्रकार संघात ते बोलत होते. “पूर्वी बातमीपेक्षा अग्रलेख काय यावर चर्चा होत होती. पूर्वी पां. वा गाडगीळ यांचे लेखही गाजले. त्यांचे अग्रलेख वाचनीय होते. वृत्तपत्राकडे बघत असताना, त्यांचे संपादक आणि लिखाण हे होतं. गोविंदरावांनी काय लिहिलं, इतरांनी काय लिहिलं याचं औत्सुक्य असायचं” असं शरद पवार म्हणाले.
“माफ करा. हल्ली संपादकांची ओळख नाही. मी प्रवास करत होतो. माझ्या बाजूला एक गृहस्थ होते. त्यांना विचारलं काय करता. तर ते म्हणाले टाइम्समध्ये आहे. मी एका संपादकाचं नाव घेतलं. ते म्हणाले मी वेगळ्या विभागाचा संपादक आहे. वेगवेगळे संपादक तेव्हा नव्हते. हे आमच्या डोक्यात बसत नाही” असं शरद पवार म्हणाले.
‘मला तुमची काळजी वाटते’
“मला तुमची काळजी वाटते. दिल्लीत थंडीत प्रचंड थंडी. उन्हाळ्यात प्रचंड ऊन. काही घडलं, मी दिल्लीत गेलो तर माझ्याघरासमोर 30 ते 40 कॅमेरे असतात. मला वाईट वाटतं. ते तासन् तास उभे असतात. ओझं डोक्यावर घेऊन आमच्या मागे उभं असतात. ते चित्र कसं बदलायचं हे कळत नाही. पण दक्षिणेत वेगळं चित्र आहे. तिथल्या पत्रकारांची संख्या जास्त असते. ते यातना सहन करून बातमी मिळवण्याचं काम करत असतात” असं शरद पवार म्हणाले.