मतमोजणीनंतर सर्वपक्षीय एक वाक्य लिहितील, भाजपचा राम शिंदे राहिला नाही : शरद पवार
मी राजकारणाला सुरुवात केली तेव्हा एक शक्ती उभी केली. मला खात्री आहे 24 तारखेला मतमोजणी होईल, तेव्हा सर्वपक्ष एक वाक्य लिहितील, भाजपचा राम शिंदे राहिला नाही, अशी कोपरखळी पवारांनी लगावली.
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Karjat speech) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची आज कर्जत जामखेड मतदारसंघात जाहीर सभा झाली. यावेळी शरद पवारांनी(Sharad Pawar Karjat speech) राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार हे या मतदारसंघात बदल घडवतील, असा विश्वास व्यक्त केला. याशिवाय भाजप आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला.
मी राजकारणाला सुरुवात केली तेव्हा एक शक्ती उभी केली. मला खात्री आहे 24 तारखेला मतमोजणी होईल, तेव्हा सर्वपक्ष एक वाक्य लिहितील, भाजपचा राम शिंदे राहिला नाही, अशी कोपरखळी पवारांनी लगावली.
राज्यात एकाच विधानसभेची चर्चा आहे, ती म्हणजे कर्जत-जामखेड विधानसभेची. सर्वांची झोप उडाली आहे. मुख्यमंत्री 3 वेळा येऊन गेले. राजे आले, मंत्री आले. हे म्हणत आहेत कुस्ती खेळायची. कुस्ती कोणाबरोबर खेळायची, कुस्ती खेळायची असेल तर सिंघमसारखा माणूस लागतो, असं पवार म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी कुस्तीचा विषय काढला पण त्यांना मी सांगू इच्छितो, महाराष्ट्र कुस्ती संघटनेचा अध्यक्ष मी आहे. तुम्ही कसल्या कुस्तीचा विषय काढता? यांना चिंता ही आहे मत मागायला आले तर सांगायचं काय?, असा हल्लाबोल पवारांनी केला.
ज्यांनी काळ्या आईवर प्रेम केलं, त्यांना कर्ज फेडायची ताकद नसते. यांना मत मागायचा अधिकार नाही. लोकांना रोजगार हवाय, पण यांनी रोजगार दिला नाही. काम द्यायचे असेल तर कारखानदारी उभी काढावी लागते. आम्ही अनेक ठिकाणी कारखाने काढले. पाच वर्षे झाले भाजपच्या राज्यात मंदी आली, असा दावा शरद पवारांनी केला.
आम्ही रोजगार उपलब्ध केले, मात्र आता नव्या पिढीला काम नाही. ज्यांना काम आहे त्यांनादेखील नोकरी सोडावी लागतेय. जर नोकऱ्या मिळत नसेल तर यांना आशीर्वाद देऊ नका, रोहितला पाठींबा दिला तर आता परिवर्तन होणारच, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.
52 वर्ष झाले तेव्हा मी रोहितच्या वयाचा होतो. मी निवडणुकीत उभा राहिलो तेव्हा ही बारामतीची परिस्थिती कर्जत-सारखी होती. तुम्ही जर रोहितला पाठींबा दिला तर मला खात्री आहे या तरुणाने कसा विकास केला हे पाहायला पंतप्रधानदेखील या भागात येतील. तुमची साथ आणि त्याची दृष्टी कर्जत जामखेडचा कायापालट करेल, असंही शरद पवार म्हणाले.
मला खात्री आहे 5 वर्षात चित्र बदलायला लागेल. मला खात्री आहे 24 तारखेला बदल होईल, असं पवारांनी सांगितलं.