बुधवारी भाजपात ‘मेगा भरती’, अनेक आमदारांसह नगरसेवकांचा पक्षप्रवेश
नेमका कोणाचा प्रवेश होणार याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आलेली नसली तरी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते यामध्ये असल्याचं सांगण्यात येतंय. बुधवारी सकाळी 10 वाजता गरवारेमध्ये हा पक्ष प्रवेश कार्यक्रम होईल, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला बुधवारी सर्वात मोठा धक्का बसणार आहे. वानखेडे मैदानातील गरवारे पवेलियनमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात तीन आमदार (NCP MLA’s) आणि अनेक नगरसेवकांचा भाजपात प्रवेश होणार आहे. नेमका कोणाचा प्रवेश होणार (NCP MLA’s) याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आलेली नसली तरी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते यामध्ये असल्याचं सांगण्यात येतंय. बुधवारी सकाळी 10 वाजता गरवारेमध्ये हा पक्ष प्रवेश कार्यक्रम होईल, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय.
महाजनादेश यात्रेच्या लोगोचं अनावरण करण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेक जण भाजपात येणार असल्याचं यावेळी चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं.
भाजपात कोण-कोण येणार?
कालिदास कोळंबकर
नारायण राणेंचे कट्टर समर्थक आणि काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे कोळंबकरांनी आपला राजीनामा सुपूर्द केला. यानंतर बुधवारी 31 जुलैला कोळंबकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून कालिदास कोळंबकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं. गेल्या साडेचार वर्षात काँग्रेस पक्षाने माझ्या मतदारसंघातले प्रश्न सोडवण्यात न्याय दिला नाही. त्यामुळेच मी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याची भावना कालिदास कोळंबकरांनी याआधीच व्यक्त केली होती.
कालिदास कोळंबकर यांचा परिचय
कालिदास कोळंबकर हे मुंबईतील वडाळा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार आहेत.
सलग सातवेळा ते विधानसभेवर निवडून आले आहेत.
नारायण राणेंचे कट्टर समर्थक म्हणून कोळंबकर यांची ओळख आहे.
नारायण राणेंसोबत त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
राणेंसोबत आलेले सर्व आमदार शिवसेनेत परतले, मात्र केवळ कालिदास कोळंबकर हे काँग्रेसमध्येच राहिले. आता कालिदास कोळंबकर काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश करणार आहेत.
नवी मुंबईतील नाईक कुटुंब
बुधवारच्या पक्षप्रवेशासोबतच भाजपच्या ताब्यात आणखी एक महापालिका येणार आहे. नवी मुंबई महापालिकेच्या महापौरांसह 57 नगरसेवक, माजी मंत्री गणेश नाईक, त्यांचे चिरंजीव ऐरोलीचे आमदार संदीप नाईक भाजपात प्रवेश करणार आहेत. 111 सदस्य असलेल्या नवी मुंबई महापालिकेत भाजपचे 6, शिवसेनेचे 38 आणि राष्ट्रवादीचे 57 नगरसेवक आहेत. पण हे सर्व नगरसेवक भाजपात आल्याने भाजपला सत्ता मिळणार आहे.
चित्रा वाघ, पिचड पिता-पुत्र
राष्ट्रवादीच्या माजी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी नुकताच त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर त्या भाजपात प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट झालंय. याशिवाय माजी मंत्री मधुकर पिचड आणि नगर जिल्ह्यातील अकोलेचे आमदार वैभव पिचडही भाजपात प्रवेश करणार आहेत.