राष्ट्रवादीकडून रावेरची जागा काँग्रेसला
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसने आपली रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला सोडली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगली येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली. भाजपकडून रावेरमधून विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, आता रावेरमधून काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. वंचित बहुजन आघाडीने रावेरमधून नितीन कांडेलकरांना उमेदवारी […]
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसने आपली रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला सोडली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगली येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली.
भाजपकडून रावेरमधून विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, आता रावेरमधून काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. वंचित बहुजन आघाडीने रावेरमधून नितीन कांडेलकरांना उमेदवारी दिली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत रावेरच्या जागेवर भाजपच्या रक्षा खडसेंचा विजय झाला होता. त्यामुळे यावेळी येथे कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने जळगावची जागा आपल्याकडे ठेवली आहे. भाजपने येथून स्मिता वाघ यांना तर राष्ट्रवादीने गुलाबराव देवकर यांना मैदानात उतरवले आहे. वंचित बहुजन आघाडीने जळगावमधून अंजली रत्नाकर बाविस्कर यांना उमेदवारी दिली आहे.
‘न्यायालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. त्यावरुन मुख्यमंत्री फडणवीसांनी कायदा-सुव्यवस्था कशी राबवली हे स्पष्ट होते. हेच त्यांच्या कामाचे प्रमाणपत्र आहे’, असाही टोला जयंत पाटील यांनी फडणवीसांना लगावला. ते पुढे म्हणाले, ‘आपले सॅटेलाईट भारताच्याच संशोधकांनी पाडले. मात्र, चंद्रकांत पाटील म्हणतात शत्रू राष्ट्राचे सॅटेलाईट पाडले. चीन आणि पाकिस्तानचे सॅटेलाईट पाडले असे म्हणणाऱ्या बुद्धिमान चंद्रकांत पाटलांसारख्या नेत्यांविषयी काय बोलायचे .’
यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीवरही टीका केली. ते म्हणाले, ‘राज्यात आघाडीची मते खाण्यासाठी आणि भाजपला मदत करण्यासाठी एक आघाडी तयार केली आहे. मात्र, त्यांना प्रतिसाद मिळणार नाही.