पुणे : राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी यासंदर्भात घोषणा केली. पुण्यातील पी. एन. गाडगीळ सराफ पेढीचे प्रमुख सौरभ गाडगीळ यांना तब्बल 50 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी बांदल यांच्या अंगलट आलं आहे. (NCP Managaldas Bandal expelled)
पुण्यातील सराफाकडे 50 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी बांदल यांची पोलिस चौकशी सुरु आहे. या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
अटकेतील तिघांपैकी एक आरोपी आपलं काम पाहत असल्याची माहिती बांदल यांनी संबंधित सराफाला खंडणी मागण्याच्या काही दिवस आधी दिली होती, असं पोलिसात दाखल तक्रारीत म्हटलं आहे. त्यानुसार पुणे पोलिसांनी काल बांदल यांची चौकशी केली होती.
मंगलदास बांदल यांच्यावर पोलिस कारवाई करणार का, याकडे लक्ष लागलं असताना पक्षाने थेट हकालपट्टीचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
काय आहे पत्रक?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांची खंडणी विरोधी पथकाकडून चौकशी सुरु असल्याबाबतच्या बातम्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे पक्षाची बदनामी होत असल्याने मंगलदास बांदल यांना पक्षातून निलंबित करण्यात येत आहे’ असं पत्रकात म्हटले आहे.
NCP’s Maharashtra unit vice president, Managaldas Bandal, has been expelled from the party after his name appeared in an extortion case registered with Pune police. pic.twitter.com/UTW7joaKGR
— ANI (@ANI) March 14, 2020
याआधी, राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांना शिवाजी भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. बँकेमार्फत बेनामी कर्जवाटप केल्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आमदारासह चौघांना अटक केली होती. अनिल भोसले हे राष्ट्रवादीचे विधानपरिषदेवरील आमदार आहेत.
अनिल भोसले, त्यांची नगरसेविका पत्नी रश्मी भोसले यांच्यासह 16 जणांवर शिवाजी भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बँकेत 71 कोटी 78 लाखांचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
NCP Managaldas Bandal expelled