मुंबई: भाजपचा उत्तर महाराष्ट्रातील एक बडा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. या नेत्याला पक्षात प्रवेश देऊन कोणती जबाबदारी द्यायची? याचा निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यालयात खलबतं सुरू आहेत. त्यामुळे भाजपचा उत्तर महाराष्ट्रातील नेमका कोणता नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. (NCP Meeting On BJP Big Leader Join NCP)
भाजपच्या उत्तर महाराष्ट्रातील नेत्याला पक्षात प्रवेश देण्यासाठी शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, अमळनेरचे राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील आणि गुलाबराव देवकर इत्यादी नेते उपस्थित आहेत. उत्तर महाराष्ट्रातील नेत्यांचं म्हणणं ऐकून घेऊनच भाजपच्या या बड्या नेत्याला पक्षात प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठीच पवारांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात खलबतं सुरु आहेत.
उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे प्रतिनिधी म्हणून देवकर आणि अनिल पाटील यांच्याशी पवार चर्चा करत आहेत. तसेच या नेत्याला पक्षात प्रवेश दिल्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील बदलणारी राजकीय गणितं आणि त्यातून राष्ट्रवादीला होणाऱ्या फायद्या तोट्यावरही या बैठकीत चर्चा सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
त्याशिवाय या नेत्याला पक्षात संघटनात्मक जबाबदारी द्यायची का? किंवा या नेत्याचा मंत्रिमंडळात समावेश करायचा यावरही या बैठकीत चर्चा केली जात असल्याचं बोललं जात आहे.
राष्ट्रवादीत प्रवेश करु इच्छिणाऱ्या या नेत्याचं नाव अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. त्यामुळे भाजपचा हा बडा नेता कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे. उत्तर महाराष्ट्र भाजपमध्ये दोन गट पडलेले आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र भाजपात सध्या असंतोषाचं वातावरण आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं राजकीय सूत्रांचं म्हणणं आहे.
दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील भाजपचा बडा नेता राष्ट्रवादीच्या गळाला लागल्यास राष्ट्रवादीला सहकार क्षेत्रात मोठा फायदा होणार आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पक्ष विस्तारवेळी भाजपचं वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठीही राष्ट्रवादीला फायदा होणार असल्याचं बोललं जातं आहे.
संबंधित बातम्या :
Maratha Reservation | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजेंकडून मोदींना पत्र, भेटीची मागणी
कृषी विधेयकावरुन सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, निलंबित खासदारांचा रात्रीचा मुक्कामही संसदेबाहेरच