गाडीवर हल्ला करणारा ‘तो’ मनसे कार्यकर्ता अमोल मिटकरींच्या ओळखीचा, एकत्र फोटोमुळे खळबळ
अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे आणि मिटकरींचा एकत्र फोटो समोर आला आहे.
Amol Mitkari Car attack : राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सुपारीबाज असा उल्लेख केला. यामुळे मनसैनिक संतप्त झाले. मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून अमोल मिटकरींच्या गाडीची काच फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता या प्रकरणानंतर एक मोठा ट्वीस्ट समोर आला आहे. अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे आणि मिटकरींचा एकत्र फोटो समोर आला आहे.
अमोल मिटकरी यांच्या वाहनावर काही दिवसांपूर्वी मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. यावेळी त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. या प्रकरणावरुन आता मनसे विरुद्ध अमोल मिटकरी असे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच आता अमोल मिटकरी आणि त्यांच्या वाहनावर हल्ला करणारे मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांचा एकत्र फोटो समोर आला आहे.
गेल्या महिन्यात अमोल मिटकरी यांचा वाढदिवस होता. या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला मनसेच्या जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी हजेरी लावली होती. अमोल मिटकरी आणि पंकज साबळे यांचा फोटो समोर आल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
अमोल मिटकरी यांची टीका काय?
“दिलेला शब्द पाळणाऱ्या अजित दादांबद्दल सुपारी बहाद्दरांनी बोलू नये. कारण हे सुपारी बहाद्दर टोल नाका, भोंग्यांच्या आंदोलन असेल ते कोणत्याच आंदोलनात यशस्वी झालेले नाहीत. त्यांची विश्वासाहर्ता संपलेली आहे. आणि राजकारणात महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहास सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तीने अजित पवार यांच्याबद्दल प्रश्न निर्माण करणं म्हणजे हे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे”, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली होती.
या टीकेनंतर मनसैनिक आक्रमक झाले. त्यांनी मंगळवारी दुपारी अकोल्यामध्ये अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला. अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. मिटकरी हे विश्रामगृहात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत असताना हा हल्ला झाला. मनसेने केलेल्या हल्ल्याचा निषेध अमोल मिटकरींनी केला. लोकांचे जीव घेण्याचे आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिले होते का?, असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला.