बारामती : राज्यात अनेक ठिकाणी शिवजयंती अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. कारण, जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झालेत आणि देश शोकसागरात आहेत. पण इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांना या सगळ्याचा विसर पडला आणि त्यांनी बेभान होऊन डान्स केला. त्यांच्या या कृत्याविरोधात नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
संपूर्ण देशात पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामुळे दु:खाचं सावट आहे. असं असतानाच इंदापूरमध्ये शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत चक्क राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी डान्स केला. देश पुलवामा घटनेनंतर हादरुन गेलेला असताना इंदापूरच्या आमदारांनी मिरवणुकीत नृत्य करुन असंवेदनशीलतेचा कहरच केल्याची चर्चा आता होऊ लागली आहे.
इंदापूरमध्ये शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या मिरवणुकीत सहभागी झालेल्या इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी चक्क डान्स केला. एकीकडे पुलवामा घटनेनं देश हादरलेला असताना इंदापूरच्या आमदारांनी डान्स केल्याने त्यांना या घटनेचा विसर पडलाय का असाच सवाल उपस्थित होऊ लागलाय. विशेष म्हणजे, आमदारांनी जिथे नृत्य केलं, त्याच ठिकाणी पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजलीचे फलक होते.
पाहा आमदारांचा डान्स :
VIDEO : बाजूलाच शहिदांच्या श्रद्धांजलीचे फलक, पण राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा बेभान डान्स pic.twitter.com/iaWThgKUkO
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 19, 2019