मुंबई : नुकताच शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. सुनावणीत त्यांनी ठाकरे गट आणि शिंदे गट कोणाच्याही आमदाराला अपात्र ठरवलं नाही. शिंदे गटाला त्यांनी अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून मान्यता दिली. यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाचा आधार घेतला. आता राहुल नार्वेकर यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच अपात्रता प्रकरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मागच्यावर्षी फूट पडली. अजित पवार गट आणि शरद पवार गट निर्माण झाले. शरद पवार गट विरोधी बाकांवर बसतो, तर अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. शिवसेनेसारखच हे प्रकरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरु आहे.
आता माहिती अशी आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रात प्रकरणाच्या सुनावणीसाठी विधीमंडळ 10 दिवसांची मुदतवाढ मागण्याची शक्यता आहे. सूत्रांनी ही माहिती दिलीय. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद होणार आहे. महाराष्ट्रात 27 ते 29 जानेवारी दरम्यान अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील सर्व विधानसभा व विधानपरिषदेचे सभापती, उपसभापती व सचिव या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
सुनावणी घेणं कठीण?
परिषदेच्या तयारीसाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्य शासकीय व महापालिकेचे बडे अधिकारी बैठकीला हजेरी लावणार आहेत. विधीमंडळात पार पडणाऱ्या परिषदेमुळे 3 दिवस राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी घेणं कठीण आहे. विधीमंडळाकडून सर्वोच्च न्यायालयात मुदतवाढीसाठी लवकरच अर्ज केला जाण्याची शक्यता आहे.