निधी वाटपावरून राष्ट्रवादीचे आमदार संतापले; मंत्र्यांना दिला रस्त्यावर येण्याचा इशारा
जागावाटपावरून महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये कुरुबुरी सुरू आहेत. एकमेकांवर टीकाटिप्पणी होत आहे. अशातच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित पवार आणि भाजपचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यात वादाची ठिणगी पडली. या वादावरून राष्ट्रवादीचे आमदार संतापले आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात विधानसभेची तयारी सुरू झाली आहे. राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आणण्यासाठी तिन्ही पक्षांनी कंबर कसली आहे. जागावाटपावरून महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये कुरुबुरी सुरू आहेत. एकमेकांवर टीकाटिप्पणी होत आहे. अशातच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित पवार आणि भाजपचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यात वादाची ठिणगी पडली. गिरीश महाजन यांनी आपल्या विभागाला जास्त निधी मिळावा अशी मागणी केली. महाजन यांनी अजितदादा यांना सिन्नर तालुक्यात एका स्मारकासाठी कोट्यवधी निधी कसा दिला अशी विचारणा केली. त्यावरून अजितदादा आणि महाजन यांच्यात खडाजंगी झाली. मात्र, या वादावरून राष्ट्रवादीचे आमदार संतापले आहेत.
मंत्रिमंडळात निधी वाटपावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप मंत्री गिरीश महाजन यांच्यात झालेल्या खडाजंगीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे आक्रमक झाले आहे. माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा) गटाचे सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांच्याच मतदारसंघात एक स्मारक बांधण्यात येणार आहे. त्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी निधी मंजूर केला आहे.
आमदार माणिकराव कोकाटे यांनी सत्तेमध्ये वेगवेगळ्या पक्षाचे मंत्री आहेत. ते कुणाचेही नीट काम करत नाहीत. सगळ्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. त्यांच्यामध्ये काय सुरू आहे हे कळत नाही. मंत्र्यांचे काय सुरू आहे हे त्यांचे त्यांनाच कळत नाही. मंत्री महोदय जबाबदारीने काम करत नाहीत. ते त्यांच्याच अविर्भावात फिरत असतात. मी अनेक वेळा तक्रारी केल्या असे आमदार कोकाटे म्हणाले.
मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी अजूनही सुधरावे. लोकाभिमुख कामे करावी. आमदारांची जी कामे आहेत त्यांना बोलून मंत्र्यांनी त्यांची कामे करून द्यावी. मंत्री महोदय मंत्रालयात येत नाहीत. लोकांची कामे करत नाहीत. जनतेचे प्रश्न सोडवत नाहीत असा गंभीर आरोपही आमदार कोकाटे यांनी केला.
आमदार विकासकामांसाठी निधी मागत असतो. पण, कोणी मंत्री निधी वाटपावरून असे नखरे करत असेल. भांडण करत असेल, निधी वाटपावरून फाईल अडवत असेल तर आम्हाला रस्त्यावर यावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी बैठक घ्यावी. आमदारांची कामे मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी मंत्र्यांना द्याव्यात, अशी मागणीही आमदार कोकाटे यांनी केली.