मालेगावात राष्ट्रवादीला धक्का, माजी आमदाराचा MIM मध्ये प्रवेश
राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम केला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले माजी आमदार मुफ्ती इस्माइली यांनी आज (30 ऑगस्ट) एम.आय.एममध्ये प्रवेश केला आहे.
मालेगाव : विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेसला अनेक धक्के बसत आहेत. राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम केला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले माजी आमदार मुफ्ती इस्माईल (MLA Mufti Mohammed Ismail) यांनी आज (30 ऑगस्ट) एम.आय.एममध्ये (MIM) प्रवेश केला आहे. एम. आय. एमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील (MLA Imtiaz Jaleel) यांच्या प्रमुख उपस्थितीत इस्माईल (MLA Mufti Mohammed Ismail Join MIM) यांनी मालेगाव महागटबंधनाच्या 20 नगरसेवक आणि समर्थकांसह एमआयएममध्ये प्रवेश केला.
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी जवळपास निश्चित आहेत. त्यामुळे मालेगावमधील जागा काँग्रेसचे आमदार आसिफ शेख यांच्या वाटेला येणार आहे. त्यामुळे मुफ्ती यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत आज एम.आय.एममध्ये प्रवेश केला. यासोबतच ते यंदाची विधानसभा निवडणूक एम आय एम च्या तिकिटावर लढणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
“मुफ्ती इस्माईल यांच्या पक्षप्रवेशामुळे एम.आय.एमची ताकद वाढल्याची प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी दिली आहे.” तसेच येत्या काळात अनेक पक्षातील नेते एम आय एममध्ये मेगाभरती होणार आहे. त्याची सुरुवात मालेगावातून झाल्याचा जलील यांनी सांगितले.