शरद पवार-मल्लिकार्जुन खरगेंमध्ये वाद; संजय राऊतांच्या ‘त्या’ गौप्यस्फोटावर रोहित पवार म्हणतात…
शरद पवार आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात काय चर्चा झाली मी ऐकली नाही. | Rohit Pawar
बुलडाणा: गेल्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेच्या वाटाघाटी सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्यात वाद झाल्याचा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता. यावर शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एखादा मोठा निर्णय घेताना अशा गोष्टी घडतात, अशी मोघम टिप्पणी रोहित पवार यांनी केली. (Rohit Pawar on Sanjay Raut statement about Sharad Pawar and Mallikarjun Kharge clash)
ते रविवारी बुलडाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना संजय राऊत यांच्या गौप्यस्फोटाविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर रोहित पवार यांनी अत्यंत सावधपणे प्रतिक्रिया दिली. शरद पवार आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात काय चर्चा झाली मी ऐकली नाही. मात्र, शरद पवार साहेबांनी सत्तेसाठी पुढाकार घेतला. एखादा मोठा निर्णय घेताना अशाप्रकारच्या गोष्टी (वाद) घडतात. पण ते फार महत्त्वाचे नसते, असे रोहित पवार यांनी सांगितले.
तर अमित शाह आणि शरद पवार यांच्यात सत्तास्थापनेसाठी वाटाघाटी झाल्याचे वृत्त रोहित पवार यांनी फेटाळून लावले. भाजपला त्यांचे 105 आमदार वाचवायचे आहेत. त्यामुळे भाजपकडून काहीतरी पिल्लू सोडले जाते. ही पाच वर्षे संपल्यानंतर पुढील सरकारही महाविकासआघाडीचे असेल, असा दावाही रोहित पवार यांनी केला.
यावेळी रोहित पवार यांनी मराठा आरक्षणासंदर्भातही भाष्य केले. भाजप खासदार उदयनराजे भोसले काय बोलले हे मी ऐकले नाही. मात्र, मराठा आरक्षण लवकर मार्गी लावण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. यामध्ये राजकारण करु नये, असे रोहित पवार यांनी सांगितले.
‘आम्ही चंद्रकांत पाटलांकडे दुर्लक्ष करतो, तर पडळकर कोण लागले?’
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी रविवारी सुप्रिया सुळे यांच्या एका वक्तव्यावर टीका केली होती. त्या लोकसभेतील नेत्या असून त्यांची बुद्धी बालिश असल्याची टिप्पणी पडळकर यांनी केली होती. यावर रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांचा समाचार घेतला. गोपीचंद पडळकर यांची योग्यता काय आहे, हे लोकांनी ठरवावे. त्यांच्या पक्षातील चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या मोठ्या नेत्याकडे दुर्लक्ष करत असू तर पडकरांकडेही दुर्लक्ष केले जाईल, असे रोहित पवार यांनी म्हटले.
संबंधित बातम्या:
(Rohit Pawar on Sanjay Raut statement about Sharad Pawar and Mallikarjun Kharge clash)