अमित शहा सत्तेतील प्रभावशाली नेते.. राष्ट्रवादीच्या नेत्याचं वक्तव्य, राजकीय सीमोल्लंघनाच्या चर्चा!
राजकारणात संवाद हा कायम असायला हवा. निवडणुकीत तुम्ही राजकीय व्यासपीठावर असता. धोरण पटत नसेल तर विरोधक असतात. पण इतर वेळी कायम संवाद हवा, असं माझं मत असल्याचं अमोल कोल्हे म्हणाले.
कृष्णा सोनरवाडकर, नवी दिल्लीः गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे सत्तेत असलेल्या प्रभावशाली नेत्यांपैकी एक आहेत, असं वक्तव्य केलंय. राष्ट्रवादीचे (NCP) स्पष्ट वक्ते अशी अमोल कोल्हेंची (Amol Kolhe) ओळख आहे. मात्र आज त्यांनी नवी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली. या भेटीवरून राजकीय चर्चांना उधाण आलंय. मात्र अमोल कोल्हेंनी या भेटीमागे राजकीय कारण नसल्याचं म्हटलंय.
अमोल कोल्हेंचा ‘शिवप्रताप गरूड झेप’ हा चित्रपट दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील बारकावे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावे, अशी अमोल कोल्हेंची भूमिका आहे. यासंदर्भात त्यांनी अमित शहांची भेट घेतली.
यावेळी अमोल कोल्हेंनी tv9 शी बातचित केली. ते म्हणाले, हे वास्तव आहे की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सत्तेत असलेल्या प्रभावशाली नेत्यांपैकी एक आहेत…
सीबीएसईच्या पुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सविस्तर स्वरुपात नाही, अशी आपण खंत व्यक्त करतो. तसेच शिवनेरी किल्ल्यावर अजूनही महाराजांच्या स्वराज्याचा भगवा ध्वज नाही, अशीही भूमिका मी संसदेत मांडली होती.
या खंत व्यक्त करतो, तेव्हा त्या पूर्ण होण्यासाठी प्रभावशाली नेत्यांचं पाठबळ मिळालं तर त्या नक्कीच पूर्ण होण्यासाठी मदत होऊ शकते.
छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास देशपातळीवर आणखी अधोरेखित व्हावा, यासाठी चित्रपटाचं स्पेशल स्क्रीनिंग दिल्ली घ्यावं अशी इच्छा आहे. त्यासाठी अमित शहांनी वेळ द्यावी, याकरिता ही भेट असल्याचं अमोल कोल्हे यांनी सांगितलं.
अमोल कोल्हे आणि अमित शहांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आलंय. अमोल कोल्हे राजकीय सीमोल्लंघन करणार का, असा सवाल विचारला जातोय…
पहा अमोल कोल्हे काय म्हणाले?
मात्र राजकारणात संवाद हा कायम असायला हवा. निवडणुकीत तुम्ही राजकीय व्यासपीठावर असता. धोरण पटत नसेल तर विरोधक असतात. पण इतर वेळी कायम संवाद हवा, असं माझं मत असल्याचं अमोल कोल्हे म्हणाले.
त्यामुळे या भेटीला राजकीय रंग देण्याचं कारण नाही, असंही कोल्हे म्हणाले.