सरकारी कंत्राटदार ते शरद पवारांच्या मर्जीतला नेता, जाणून घ्या सुनील तटकरेंचा राजकीय प्रवास

| Updated on: Aug 21, 2021 | 8:16 AM

MP Sunil Tatkare | वडिलांच्या निधनानंतर हाच राजकारणाचा वारसा पुढे नेत सुनील तटकरे 1984 पासून काँग्रेसमध्ये सक्रिय झाले. काँग्रेस तालुका सरचिटणीस, रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अशा एक-एक पायऱ्या चढत ते संघटनेत वर गेले.

सरकारी कंत्राटदार ते शरद पवारांच्या मर्जीतला नेता, जाणून घ्या सुनील तटकरेंचा राजकीय प्रवास
सुनील तटकरे, खासदार
Follow us on

मुंबई: अनेक राजकीय जाणकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्णन हमखास निवडून येणाऱ्या नेत्यांची शरद पवार यांनी बांधलेली मोट, असे केले करतात. याच हमखास निवडून येणाऱ्या नेत्यांमध्ये आणि सातत्याने पवार कुटुंबीयांच्या निकवर्तीयांपैकी एक असलेले नेते म्हणजे सुनील तटकरे. अनंत गीते यांच्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या रायगड लोकसभा मतदारसंघात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी विजय मिळवला होता. कोकणात राष्ट्रवादी काँग्रेसची पाळेमुळे रोवण्यात सुनील तटकरे यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सुसंस्कृत, अभ्यासू वृत्ती आणि लोकांच्या समस्यांविषयी असलेली कणव या सुनील तटकरे यांच्या जमेच्या बाजू मानल्या जातात. आजपर्यंत सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीत संघटना पातळीवर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. आजही महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमध्ये सुनील तटकरे यांचे नाव आवर्जून घेतले जाते.

कोण आहेत सुनील तटकरे?

सुनील तटकरे यांचा जन्म 10 जुलै 1955 रोजी रायगडमधील कोलाड येथे झाला. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी इंटर सायन्सचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर सुनील तटकरे यांनी काही काळ सरकारी कंत्राटदार म्हणून व्यवसाय केला. 1984 साली सुनील तटकरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

सरकारी काँन्ट्रॅक्टर

राजकारणात येण्यापूर्वी सुनील तटकरे यांनी काळ सरकारी काँन्ट्रॅक्टर म्हणून काम केले. मात्र, लहानपणापासून राजकीय बाळकडून मिळाल्यामुळे त्यांचा नैसर्गिक ओढा राजकारणाकडेच होता. तरुणपणी सुनील तटकरे यांनी आपल्या वडिलांसोबत अनेक दौरे केले. या दौऱ्यादरम्यान ते दत्ताजी तटकरे यांच्या कारचे ड्रायव्हर असत. 10 मे 1984 रोजी दत्ताजी तटकरे यांचे अपघाती निधन झाले.

सुनील तटकरे यांचा राजकीय प्रवास

सुनील तटकरे यांना घरातूनच राजकारणाचा वारसा मिळाला. त्यांचे वडील दत्ताजी तटकरे हे काँग्रेसमध्ये सक्रिय होते. जवळपास गेल्या पाच दशकांपासून रोह्यासह रायगड परिसराच्या राजकारणात तटकरे कुटुंबीय सक्रिय आहेत. अदिती आणि अनिकेत तटकरे यांच्या रुपाने आता तटकरे घराण्याची पुढची पिढीही राजकारणात स्थिरावली आहे.

सुनील तटकरे यांचे वडील दत्ताजी तटकरे यांनी काँग्रेसमध्ये सरपंचपदापासून ते जिल्हा परिषद विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी सांभाळली होती. काँग्रेसमधील वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, ए.आर. अंतुले, शरद पवार या दिग्गज नेत्यांशी दत्ताजी तटकरे यांची नेहमीच जवळीक राहिली.

वडिलांच्या निधनानंतर हाच राजकारणाचा वारसा पुढे नेत सुनील तटकरे 1984 पासून काँग्रेसमध्ये सक्रिय झाले. काँग्रेस तालुका सरचिटणीस, रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अशा एक-एक पायऱ्या चढत ते संघटनेत वर गेले. 1995 साली माणगाव मतदारसंघातून ते पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभेवर निवडून गेले. त्यावेळी महाराष्ट्रात शिवसेना-भाजपची लाट होती. मात्र, सुनील तटकरे कोकणातून काँग्रेसला विजय मिळवून देणारे एकमेव उमेदवार ठरले होते. 1999 साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वेगळी चुल मांडल्यानंतर सुनील तटकरे हे त्यांच्यासोबत गेले.

त्यानंतर 1999 आणि 2004 मध्ये ते माणगाव विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. तर 2009 मध्ये श्रीवर्धन मतदारसंघातूनही त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवत बाजी मारली. 2004 मध्ये सुनील तटकरे अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री झाले. 2008 साली ते राज्याचे उर्जामंत्री झाले. तर 2009 मध्ये सुनील तटकरे यांच्याकडे राज्याच्या अर्थमंत्रालयाची धुरा सोपवण्यात आली. 2014 मध्ये त्यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, अनंत गीते यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. परंतु, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांनी या पराभवाची परतफेड केली होती.

तटकरे कुटुंबातील नवी पिढीही राजकारणात

सुनील तटकरे यांची कन्या अदिती तटकरे या आमदार आहेत. तर पुत्र अनिकेत तटकरे विधानपरिषदेवर निवडून गेले आहेत. सुनील तटकरे यांचे ज्येष्ठ बंधू अनिल तटकरेही विधानपरिषदेचे माजी आमदार होते. मात्र, गेल्या काही काळापासून दोन्ही भावांमध्ये वाद सुरु आहेत.
अनिल तटकरे यांचे पुत्र अवधुत तटकरे हे 12 वर्षे रोह्याचे महापौर होते. कौटुंबिक वादानंतर 2019 साली अवधुत तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच पत्नी शुभदा तटकरे यादेखील जिल्हा परिषदेत सक्रिय आहेत. तटकरे कुटुंबातील या गृहकलामुळे स्थानिक राजकारणात दोन गट पडले आहेत.