‘ओल्ड मॅन इन वॉर’ पवारांची कन्या, बापासारखीच कणखर, राष्ट्रीय राजकारणात रस; पण लक्ष महाराष्ट्रात; वाचा सविस्तर
राष्ट्रीय राजकारणात यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचा असलेला गुण सुप्रिया सुळे यांच्याकडे आहे. | Supriya Sule NCP
मुंबई: महाराष्ट्राचं राजकारण म्हटलं की पवार घराण्याचा उल्लेख हा अनिवार्य ठरतो. महाराष्ट्राच्या राजकारणातील प्यादी आजही लिलया हलवणारा आणि ‘ओल्ड मॅन इन वॉर’ असे संबोधले जाणाऱ्या शरद पवार यांच्याभोवती प्रचंड वलय आहे. मात्र, हे वलय बाजूला सारुन अजित पवार, सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि रोहित पवार हे तीन पुढच्या पिढीतील शिलेदार राजकारणात आपली वेगळी ओळख प्रस्थापित करण्यात यशस्वी ठरले आहेत. (NCP MP Supriya Sule Political journey)
यापैकी सुप्रिया सुळे यांच्या राजकारणाचा आणि नेतृत्त्वाचा बाज अजित पवार आणि रोहित पवार यांच्यापेक्षा सर्वार्थाने वेगळा ठरतो. शरद पवार यांच्या तालमीत तयार झालेल्या सुप्रिया सुळे जाणीवपूर्क किंवा कदाचित आणखी कोणत्या कारणाने महाराष्ट्रातील राजकारणापासून दूर राहिल्या आहेत. त्याऐवजी सुप्रिया सुळे यांनी आपले लक्ष हे राष्ट्रीय राजकारणावर केंद्रित केल्याचे दिसते. शरद पवार यांच्याप्रमाणे त्यांना राजकारणाची आणि समाजकारणाची पूरेपूर जाण आहे. याच संयमी आणि अभ्यासू वृत्तीच्या जोरावर सुप्रिया सुळे संसदेत राष्ट्रवादीचा आवाज बुलंद करताना दिसतात.
कोण आहेत सुप्रिया सुळे?
सुप्रिया सुळे यांचा जन्म 3 जून 1969 रोजी झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर बारामती मतदारसंघातून त्या लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांची स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. 16 व्या लोकसभेत सुप्रिया सुळे या संसदेत महाराष्ट्राकडून सर्वाधिक प्रश्न उपस्थित करणाऱ्या खासदार ठरल्या होत्या. त्यांनी पाच वर्षांत संसदेत 1176 प्रश्न विचारले होते.
उत्तम वाकपटू, हिंदी-इंग्रजीवर प्रभुत्त्व
राष्ट्रीय राजकारणात यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचा असलेला गुण सुप्रिया सुळे यांच्याकडे आहे. त्यांचे हिंदी आणि इंग्रजी भाषेवर उत्तम प्रभुत्त्व आहे. त्यामुळेच संसदेत त्या कोणत्याही मुद्द्यावर सविस्तरपणे बोलू शकतात. या जोडीला त्यांच्याकडे अभ्यासू आणि संयमी वृत्ती आहे. त्यामुळेच सुप्रिया सुळे यांनी संसदेत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
शरद पवारांच्या उत्तराधिकारी?
अनेकदा राजकारणात शरद पवार यांचा उत्तराधिकारी कोण, असा प्रश्न विचारला जातो. मग हा उत्तराधिकारी अजित पवार की सुप्रिया सुळे, असा साहजिक प्रश्न उपस्थित होतो. मात्र, या चर्चेचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.
अजित पवार यांनी महाराष्ट्रात आपले स्थान बळकट केले आहे. तर सुप्रिया सुळे यांचे संपूर्ण लक्ष राष्ट्रीय राजकारणाकडे आहे. तरीही अधुनमधून सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होणार, अशा चर्चा घडत असतात. मात्र, शरद पवार यांनीच सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय राजकारणात अधिक रस असल्याचे म्हटले होते.
प्रत्येकाचा एक इंट्रेस्ट असतो. सुप्रिया सुळे यांना राज्याच्या राजकारणात रस नाही. तिचा इंट्रेस्ट राष्ट्रीय राजकारणात आहे. संसदेत आहे. उत्तम संसदपटू म्हणून तिला आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत, असे शरद पवार यांनी सांगितले होते.
शरद पवार रुग्णालयात, सुप्रिया सुळेंचं ‘ब्रीच कँडी’च्या गेटवरुन भाषण
एकीकडे शरद पवारांचं आजारपण आणि दुसरीकडे पंढरपूर विधानसभेची प्रतिष्ठेची पोटनिवडणूक अशा दुहेरी पेचात सापडलेल्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी वेळ पडल्यास एखादी स्त्री किती मल्टीटास्किंग होऊ शकते, याचा प्रत्यय आणून दिला होता. शरद पवार यांना ऐनवेळी रुग्णालयात दाखल करावे लागल्याने सुप्रिया सुळे प्रचाराला जाऊ शकल्या नव्हत्या. तेव्हा त्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयाच्या गेटबाहेर उभे राहून पंढरपूरच्या मतदारांशी व्हर्च्युअल संवाद साधला होता.
‘मी डाएट करतेय’, मुख्यमंत्री बोलत असताना मध्येच सुप्रिया सुळेंचा आवाज
मध्यंतरी एका व्हीडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सुप्रिया सुळे यांच्याबाबत किस्साही चांगलाच चर्चेत होता. मुख्यमंत्री कोव्हिड सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी बोलत असताना मध्येच मी डाएट करतेय असा आवाज ऐकू आला आणि उद्धव ठाकरे तेथेच थांबले. यानंतर हा आवाज सुप्रिया सुळे यांचा असल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली. अजित पवार यांनीही सुप्रिया सुळे यांना ही गोष्ट लक्षात आणून दिली.
झालेला प्रकार लक्षात आल्यावर सुप्रिया सुळे यांनी तात्काळ ‘सॉरी, सॉरी, सॉरी’ म्हणत दिलगीरी व्यक्त केली. तसेच चुकीने मुख्यमंत्री बोलत असताना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा माईक ऑन राहिल्याचं नमूद केलं. विशेष म्हणजे या प्रकारात मुख्यमंत्री आपला आधीचा मुद्दाही विसरल्याचं दिसून आलं. त्यानंतर त्यांना मी कुठपर्यंत बोलत आलो होतो? हे विचारावं लागलं.
…आणि सुप्रिया सुळे मुलावर चिडल्या
काही वर्षांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी एका कार्यक्रमात एक किस्सा सांगितला होता. आम्ही संतांनी दिलेल्या एकत्वाच्या, समतेच्या विचारांवर वाढलो, पण अलीकडची पिढी व्हॉट्सअॅपवर वाढते आहे, असे म्हणत घरचाच किस्सा सुप्रियाताईंनी कथन केला. ‘माझ्या मुलाने माझा उल्लेख करताना “सूप’ असा केला, तेव्हा मी त्याच्यावर उखडले. तर तो म्हणाला, तूच आऊटडेटेड आहेस.. शिवाजी मंदिर, रवींद्र नाट्य मंदिर हे आमचे हॉटस्पॉट होते, अलीकडे मुले वाचतच नाहीत, अशी खंतही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली होती.
संबंधित बातम्या:
52 लोक शरद पवारांना सोडून गेले, एकही आमदार झाला नाही हा महाराष्ट्राचा इतिहास : सुप्रिया सुळे
VIDEO सुप्रिया सुळेंचा हलगीवर ठेका
(NCP MP Supriya Sule Political journey)