नागपुरात ‘उलटी गंगा’, भाजपचा माजी आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर
नागपुरातील भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे
नागपूर : राष्ट्रवादीला ‘मेगागळती’ लागून सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या वळचणीला अनेक आमदार जात असतानाच नागपुरात ‘उलटी गंगा’ (BJP Leader in NCP) वाहताना दिसत आहे. भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे राष्ट्रवादीच्या वाटेवर (BJP Leader in NCP) असल्याची चर्चा आहे.
नागपुरातील भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची विजय घोडमारेंनी भेट घेतल्याची माहिती आहे. हिंगणा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, मात्र भाजपने आपला झेंडा रोवला आहे.
विजय घोडमारे हे 2009 मध्ये नागपुरातील हिंगणा विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. मात्र 2014 मधील विधानसभा निवडणुकांच्या वेळी विजय घोडमारे यांना उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे घोडमारे तेव्हापासून नाराज होते.
2019 च्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पुन्हा तिकीट न मिळण्याची शक्यता असल्यामुळे नाराज असलेल्या विजय घोडमारे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न सुरु केल्याची चर्चा आहे. यंदाही विद्यमान आमदार समीर मेघे यांनाच भाजप पुन्हा तिकीट देण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून हिंगणा मतदारसंघात उमेदवारी मिळावी, यासाठी घोडमारे प्रयत्न करत असल्याची माहिती आहे. जयंत पाटील यांच्या भेटीत घोडमारेंनी तिकीटासाठी प्रयत्न केल्याची शक्यता आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीकडून माजी मंत्री रमेश बंग यांना पराभव स्वीकारावा लागत आहे. 2009 मध्ये बंग यांचा घोडमारेंनीच पराभव केला होता.
हिंगणा मतदारसंघाचा इतिहास
2019 च्या लोकसभा निवडणुकीत रामटेकमधून निवडून आलेल्या शिवसेनेच्या कृपाल तुमाने यांना हिंगणा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य मिळालं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेलं ‘फेटरी’ गाव याच विधानसभा मतदारसंघात येतं.
2009 पूर्वी हिंगणामध्ये माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रमेश बंग यांचा प्रभाव होता. मात्र 2009 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजय घोडमारे यांनी बंग यांचा अवघ्या 700 मतांनी पराभव केला आणि पहिल्यांदाच हिंगणामध्ये कमळ फुललं.
घोडमारेंना डावलून मेघेंना संधी
2014 मध्ये भाजपने तत्कालीन आमदार विजय घोडमारे यांना डावलत भाजपमध्ये आलेल्या आणि नागपूर जिल्ह्यातील राजकारणात प्रभाव असलेल्या मेघे कुटुंबातील समीर मेघे यांना संधी दिली. मोदी लाटेवर स्वार होत समीर मेघे यांनी राष्ट्रवादीच्या रमेश बंग यांचा तब्बल 23 हजार मतांनी पराभव केला. परंतु विजय घोडमारे यांची नाराजी ओढवली होती.
विद्यमान आमदार सागर मेघे पुन्हा इच्छुक आहेत. आता समीर मेघे यांच्याविरोधात विजय घोडमारे आव्हान उभं करणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.