कट्टर तटकरे समर्थक नगराध्यक्षाला महिलांकडून मारहाण
पतसंस्थेमध्ये ठेवीदार आपल्या कष्टाची कमाई जमा करतात. पण भुसाने (NCP Narendra Bhusane Shrivardhan) व्यवस्थापक असलेल्या पतसंस्थेमध्ये ठेवलेले पैसे गेल्या कित्येक महिन्यांपासून मिळत नसल्याने ठेवीदारांचा अखेर संयम सुटला.
रायगड : पतसंस्थेत ठेवीदारांचे पैसे गुंतवलेले असूनही ते देण्यास टाळाटाळ करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्याला ठेवीदारांनी चोप दिला. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेते नरेंद्र भुसाने (NCP Narendra Bhusane Shrivardhan) हे श्रीवर्धन नगरपालिकेचे नगराध्यक्षही आहेत. पतसंस्थेमध्ये ठेवीदार आपल्या कष्टाची कमाई जमा करतात. पण भुसाने (NCP Narendra Bhusane Shrivardhan) व्यवस्थापक असलेल्या पतसंस्थेमध्ये ठेवलेले पैसे गेल्या कित्येक महिन्यांपासून मिळत नसल्याने ठेवीदारांचा अखेर संयम सुटला.
श्रीवर्धन शहरातील जनसेवा पतसंस्थेतील ठेवीदारांना गेल्या दोन महिन्यांपासून पैसे मिळत नाहीत. कायदेशीर प्रक्रिया सुरू असून त्यानंतर पैसे दिले जातील, अशी नोटीसवजा कागदी माहिती पतसंस्थेच्या कार्यालयावर लावण्यात आली होती. पतसंस्थेच्या संचालकांकडून 19 तारखेपर्यंत सर्व ठेवीदारांना पैसे परत केले जातील असं सांगण्यात आलं. गुरुवारी सकाळपासून बँकेच्या ठेवीदारांनी पैशाच्या परताव्यासाठी जनसेवेच्या कार्यालयाबाहेर गर्दी केली.
पतसंस्थेकडून पैसे परत मिळत नसल्याचं निदर्शनास आल्यानंतर ठेवीदार आक्रमक बनले आणि त्यांनी पतसंस्थेचे व्यवस्थापक श्रीवर्धनचे नगराध्यक्ष नरेंद्र भुसाने (NCP Narendra Bhusane Shrivardhan) यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळत ठेवीदारांना काही वेळेसाठी शांत करण्याचा प्रयत्न केला. उपस्थित सर्व ठेवीदारांनी आपला रोख श्रीवर्धन पोलीस ठाण्याकडे वळवला आणि पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या आंदोलनास सुरुवात केली.
पतसंस्थेचे व्यवस्थापक आणि संचालकांवर गुन्हा दाखल करा आणि आमचे पैसे व इतर ठेवी परत करा, अशी मागणी ठेवीदारांनी केली. ठेवीदारांच्या आक्रमक भूमिका पाहून पोलिसांनी पोलीस ठाण्याचं मुख्य प्रवेशद्वार बंद केलं. ठेवीदारांनी केलेल्या ठिय्या आंदोलनामुळे श्रीवर्धन शिवाजी चौक ते एसटी स्टँड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
पतसंस्थेच्या गलथान कारभाराला खऱ्या अर्थाने कोण जबाबदार आहे असा प्रश्न ठेवीदार विचारत आहेत. पतसंस्थेच्या व्यवस्थापकपदी काम करणारे श्रीवर्धन नगरपरिषदेचे नगराध्यक्ष नरेंद्र भुसाने हे राष्ट्रवादीचे बडे प्रस्थ म्हणूनही ओळखले जातात. शिवाय ते रायगडचे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचे खंदे समर्थक आहेत. श्रीवर्धन मतदारसंघ हा तटकरेंचा बालेकिल्ला. पण या प्रकारामुळे नागरिकांमध्ये रोष वाढत चालला आहे.
पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. या प्रकरणात लेखा परीक्षक आणि संचालक यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. जनसेवा पतसंस्थेचा कारभार दोन वर्षांपासून ढिसाळ बनला होता असं सांगण्यात येतंय. श्रीवर्धन विद्युत महामंडळाने तीन महिन्यांपूर्वी जनसेवा पतसंस्थेत ग्राहकांना वीज बिल भरण्यासंबधी मनाई केली होती. तेव्हापासून पतसंस्थेच्या ठेवीदारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं.
दरम्यान, या पतसंस्थेतील प्रकरणाचे पडसाद थेट विधानसभा निवडणुकीतही उमटण्याची शक्यता आहे. कारण, मतदारसंघातील अनेकांच्या ठेवी या पतसंस्थेत आहेत. विशेष म्हणजे गुरुवारी सायंकाळी राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा श्रीवर्धनमध्ये येत आहे. त्यापूर्वीच नगराध्यक्ष असलेल्या व्यक्तीला मारहाण झाल्याने वातावरण तापलं आहे.