46 वर्षांचे मैत्र, शरद पवारांची हत्तीवरुन मिरवणूक काढणाऱ्या ‘जमा अप्पा’ यांचे निधन
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतेकी येथील दिग्गज नेते ज. मा. मोरे यांचे निधन झाले. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शरद पवार यांचे गेली 46 वर्षे जमा अप्पांशी अत्यंत जवळकीचे संबंध होते
इंदापूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा अत्यंत जवळचा मित्र हरपला. पुणे जिल्ह्यातील इंदापुरातील ज्येष्ठ नेते ज. मा. मोरे यांचे निधन झाले. जगन्नाथराव मारुतीराव मोरे हे ‘जमा अप्पा’ या नावाने परिचित होते.
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतेकी येथील दिग्गज नेते ज. मा. मोरे यांचे निधन झाले. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शरद पवार यांचे गेली 46 वर्षे जमा अप्पांशी अत्यंत जवळकीचे संबंध होते. मोरे हे इंदापूर तालुक्याचे माजी पंचायत समिती सभापती होते. त्यांच्या पश्चात पुत्र भारत, नातू समीर, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
पवार-सुळेंच्या दौऱ्यात हमखास सहभाग
शरद पवार किंवा त्यांच्या कन्या- राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा इंदापूर दौरा असला, की त्यांच्या दौऱ्यात जमा मोरे हे नेहमी असायचे. विशेष म्हणजे शरद पवार आपल्या गाडीमध्ये त्यांना बसवत असत आणि इंदापूर तालुक्याचा दौरा करत असत.
पवारांची हत्तीवरुन मिरवणूक
जेव्हा जेव्हा शरद पवार हे निमगाव केतकीवरुन पुढे कुठेही जात असत तेव्हा ते ‘जमा आप्पा’ यांना भेटल्याशिवाय जात नव्हते. जमा आप्पा यांनी निमगाव केतकी मध्ये शरद पवार व गोविंदराव आदिक यांची हत्तीवरून मिरवणूक काढली होती. आजही निवडणुकीच्या रणधुमाळीत या प्रसंगाची चर्चा होते.
विनोदी शैलीतील भाषणं गाजली
विनोदी शैलीची आप्पांची भाषणे ऐकायला मोठी गर्दी होत असे. पवार यांच्याबरोबरचे अनुभव प्रसंग व संपूर्ण कारकिर्दीचा लेखाजोखा त्यांनी ‘गुंफियले मोती मैत्रीचे’ या पुस्तकातून प्रकाशितदेखील केला आहे.
जमा मोरे यांनी तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली होती. ते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तसेच इंदापूर तालुका पंचायत समितीच्या स्थापनेच्या सुरुवातीलाच दहा वर्ष सभापतीपदी (1 मे 1962 ते 5 ऑगस्ट 1972) कार्यरत होते.
आयुष्यातील एक पितृतुल्य आदर्श मार्गदर्शकाला मुकलो – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
देशाचे नेते आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांचे जवळचे स्नेही मित्र व माझे मार्गदर्शक आदरणीय जगन्नाथ (आप्पा) मोरे यांच्या निधनाची बातमी मनाला फार चटका लावणारी असून, आज माझ्या आयुष्यातील एक पितृतुल्य आदर्श मार्गदर्शकाला मुकलो. आदरणीय मोरे आप्पांच्या निधनामुळे मोरे परिवारावर कोसळलेल्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. ईश्वर मोरे कुटुंबास या दु:खातून सावरण्याची शक्ति देओ, ही ईश्वर चरणी प्रार्थना, अशी आदरांजली भरणे यांनी त्यांच्या फेसबुक वर शेअर केली आहे. तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही ज.मा. मोरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.