नाशिक | 4 जानेवारी 2023 : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोदी गॅरंटीची खिल्ली उडवली आहे. केंद्र सरकारच्या सर्व योजना फसव्या ठरल्या आहेत. सर्व योजना हवेत आहेत. या योजना प्रत्यक्षात आल्याच नाहीत, असं सांगतानाच मोदींची गॅरंटी वगैरे सांगितलं जात आहे. पण मोदी गॅरंटी काही खरी नाही, असा जोरदार हल्लाबोल शरद पवार यांनी केला आहे. भाजप हा हिटलरच्या गोबेल्स नीतीचा अवलंब करून खोटा प्रचार करत असल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला आहे.
शिर्डीत दोन दिवसाचं राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यकर्ता शिबीर सुरू आहे. या शिबीराचा समारोप करताना शरद पवार यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. सत्ता आल्यानंतर भाजपने अनेक कार्यक्रम हाती घेतले. प्रत्यक्षात अंमलबजावणी न करता लोकांची फसवणूक करण्याचं काम भाजपने केलं. ते लोकांच्या लक्षात आलं आहे. मोदी संसदेत क्वचितच येतात. एखाद्या धोरणाची मांडणी अशी करतात की खासदारही थक्क होतात. घोषणाही खूप करतात. 2016 आणि 2017चा अर्थसंकल्प संसदे मांडला. त्या बजेट स्पीचमध्ये असं सांगितलं की, 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू. आज 2024 आहे. काहीच केलं नाही. मोदी एक दिवशी म्हणाले, 2022पर्यंत शहरी भागातील लोकांना पक्की घरं देऊ. पण ही घोषणा हवेतच राहिली. माझी गॅरंटी आहे, असं मोदी वारंवार सांगतात. पण ती गॅरंटी काही खरी नाही. याचा अनुभव हा अनेकवेळेला आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली.
देशाची नवी पिढी ही अस्वस्थ आहे. ती काम मागत आहे. काम मिळत नाही म्हणून अस्वस्थ आहे. पार्लमेंटमध्ये काही लोक घुसले. तरुण होते. त्यांच्या हातात गॅस सिलिंडर होते. ते मागण्या करत होते. नंतर त्यांना पकडलं. आपल्या खासदारांनी मागणी केली हे तरुण कोण होते? का आले? त्यांची मागणी काय आहे? त्याची माहिती द्या. गृहमंत्र्यांनी सांगावं. पण त्याला संमती दिली नाही. विरोधी पक्षाच्या खासदारांनी मागणी केली. त्यामुळे खासदारांना निलंबित केले. त्यात आपल्याही खासदारांचा समावेश आहे, असं पवार म्हणाले.
आज अस्वस्थता आहे. त्याचं कारण संबंध देशाचं चित्र वेगळं आहे. आज भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हातात सत्ता आहे. आक्रमक प्रचार यंत्रणा त्यांनी प्रत्येक राज्यात उभी केली आहे. त्या आक्रमक प्रचार यंत्रणेतून त्यांचा प्रचार सुरू असतो. जसं हिटलरने जर्मनीत गोबेल्स नीतीची चर्चा होती. त्यावर आधारीत असलेल्या अनेक गोष्टी जनमाणसात पेरण्याचं काम भाजपकडून सुरू आहे. त्यामुळे लोकही अस्वस्थ आहेत, असं पवार म्हणाले.
देशाचं चित्र पाहिलं तर चित्र भाजपला अनुकूल नाही. याचा उल्लेख सुप्रिया आणि इतरांनी केलाय. सातत्याने सांगितलं जातं, 450 जागा जिंकणार. काय स्थिती आहे? केरळमध्ये कम्युनिस्ट आणि काँग्रेसचं राज्य आहे. भाजप नाही. तामिळनाडूत भाजप नाही. आंध्रात भाजप नाही, पश्चिम बंगालमध्ये नाही. झारखंडमध्ये नाही. दिल्लीत भाजप नाही. पंजाबमध्ये भाजप नाही. काही ठिकाणी भाजप आहे. पण तो स्वत:च्या ताकदीवर नाही. गोव्यात काँग्रेस आणि मित्र पक्षाचं राज्य होतं. काही आमदार फोडले आणि गोव्याचं सरकार आलं. तीन राज्याच्या निवडणुका होण्याआधी मध्य प्रदेशात कमलनाथ यांचं सरकार होतं. पण आमदार फोडले आणि त्यांचं सरकार आलं. त्यामुळे तसं चित्र त्यांच्या बाजूने नाही. ते 450 म्हणो की 500 म्हणो, पण त्यांना अनुकूल चित्र नाही, असा दावा पवार यांनी केला.