कोल्हापूरचा गडी, पुण्यात वाटतो फाटकी साडी, राष्ट्रवादीकडून ‘चंपा साडी सेंटर’चं उद्घाटन
कोल्हापूरचा गडी पुण्यात वाटतोय फाटकी साडी, आम्हाला हवी विकासाची गाडी, आम्हाला नको चंपा साडी, अशी घोषणाबाजी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात केली.
पुणे : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात कोथरुडचे भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या साडी वाटपाचा निषेध केला. डेक्कन चौकात प्रतिकात्मक ‘चंपा’ साडी सेंटरचं उद्घाटन करुन जोरदार घोषणाबाजी (NCP Protest against Chandrakant Patil) करण्यात आली.
‘कोल्हापूरचा गडी पुण्यात वाटतोय फाटकी साडी, आम्हाला हवी विकासाची गाडी, आम्हाला नको चंपा साडी… रिजेक्टेड माणसाकडून रिजेक्टेड साड्या….’ अशी जोरदार घोषणाबाजी करत यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटलांचा निषेध केला.
अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या नावाचा ‘चंपा’ असा उल्लेख केल्यानंतर प्रचारात हा शब्द चांगलाच गाजला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही ‘चंपाची चंपी करणार’ असं म्हणत वादात उडी घेतली होती. आमदारपदी निवडून आल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी कोथरुडमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास महिलांना साड्या वाटल्या होत्या.
कोथरुडमध्ये साडीवाटप, महिलांची तुडुंब गर्दी, चंद्रकांत पाटील म्हणतात…
‘चंद्रकांत पाटील यांनी लोकशाहीची पायमल्ली केली असून मतदारांना प्रलोभन दाखवलं. निवडणुकीत मत मिळवताना काय काय दिलं, याचं उत्तर दिलं पाहिजे’, अशी मागणी राष्ट्रवादीच्या आंदोलकांनी केली. पुण्यातील भूखंड भ्रष्टाचारातून त्यांना मोठ्या प्रमाणात पैसा मिळाला आहे. त्यामुळे पाटील आता फुकट साडी वाटणार आणि नंतर राज्य आणि महाराष्ट्राला लुटणार, असा आरोप आमदार चेतन तुपे (NCP Protest against Chandrakant Patil) यांनी केला.
‘चंद्रकांत पाटलांनी पुणेकर जनतेची आणि राज्याची माफी मागावी. अशा भ्रष्ट माणसाची सत्तेत राहण्याची आणि आमदार होण्याची पात्रता नाही. यांनी त्वरित सत्तेतून बाजूला झालं पाहिजे’, असं आवाहन चेतन तुपे यांनी केलं. या प्रकरणी निवडणूक आयोगाने स्वतःहून कारवाई करावी. सर्व पुरावे घेऊन आम्ही तक्रार करणार असल्याचं चेतन तुपे म्हणाले.
दहा हजार साड्या जमल्याचा अंदाज आहे. एक लाख हा चुकीचा आकडा आहे. निवडणूक आता संपलेली आहे. मतांसाठी काहीही करण्याचा प्रश्नच येत नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.
25 हजारांपेक्षा जास्त मताधिक्य घेत चंद्रकांत पाटील कोथरुड मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांच्या विरोधात मनसेने किशोर शिंदे यांना उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादीने आपला उमेदवार न देता शिंदेंनाच पाठिंबा दिला होता.