“महाराष्ट्राचं नुकसान अन् गुजरातचं हित, एक दिवस मुंबईसुद्धा गुजरातला देऊन टाकतील!”
महाराष्ट्रातील उद्योग राज्यबाहेर जात आहेत. यावर राष्ट्रवादीच्या वतीने टीका करण्यात आली आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील उद्योग राज्यबाहेर जात आहेत. वेदांता, टाटाएअर बससारखा प्रकल्प राज्याबाहेर गेला. महाराष्ट्रातील तरुणांना मिळणारा उद्योग त्यामुळे कमी झाला. यासगळ्याला विरोध करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पुण्यात आंदोलन करण्यात आलं. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली.”महाराष्ट्राचं नुकसान अन् गुजरातचं हित हेच शिंदे-फडणवीस सरकारचं धोरण आहे. शिंदे-फडणवीस एक दिवस मुंबईसुद्धा गुजरातला देऊन टाकतील!” असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे (Ravikant varpe) यांनी टीका केली आहे.
घे ठेका, दे खोका असं शिंदे फडणवीस सरकार आहे. महाराष्ट्रातील उद्योग धंदे, महत्वाच्या संस्था गुजरातला घेऊन जायच्या, मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्व कमी करायचे. या ध्येयाने केंद्राने मोदी सरकार गेल्या आठ वर्षापासून काम करत आहे. राज्यात सत्तातरानंतर स्थापन स्थापन झालेले शिंदे फडणवीस सरकार हे तर गुजरातचे एजंट होऊन महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला पाठवत आहे. एक दिवस हे सरकार मुंबई ही गुजरातला देऊन टाकतील. महाराष्ट्राचे नुकसान करून गुजरातचे हित जोपासणारे शिंदे फडणवीस महाराष्ट्रद्रोही आहेत, अशा शब्दात रविकांत वरपे यांनी ही टीका केली आहे.
महाराष्ट्र देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. देशातील सर्वात जास्त मोठे उद्योग महाराष्ट्रात आहे. त्यामुळेच त्यांनी पंतप्रधान झाल्यापासून महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प आणि संस्था गुजरातला हलवण्याचा सपाटा लावला आहे. दुर्देवाने यापूर्वीचे फडणवीस आणि आताचे ईडी या दोन्ही सरकारांनी महाराष्ट्राच्या हित डावलून मोदींच्या गुजरातला जास्त महत्व दिले आहे. फडणवीस सरकारच्या काळात मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र, पालघर येथील प्रस्वातील मरीन अकादमी, मुंबईतील डायमंड बोर्स अशा अनेक महत्वाचे प्रकल्प गुजरातला गेले, असं वरपे म्हणालेत.
राज्यात सरकार बदलल्यापासून चार महिन्यात चार मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. तरुणांचं भविष्य अंधकारमय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने केलं आहे.50 खोके घेऊन तुमच्या 50 आमदारांचं पुनर्वसन करण्यासाठी नरेंद्र मोदींना तुम्ही हा महाराष्ट्र तुम्ही आंदण म्हणून दिलाय का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.
महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा डाव मोदी सरकारच्या माध्यमातून हे ईडी सरकार करतंय हे महाराष्ट्रातील तरुणांनी समजून घेतलं पाहिजे, असंही वरपे म्हणालेत.