जेसीबीवर उभं राहून नवाब मलिकांचे भाषण, चुनाभट्टी ते बीकेसी उड्डाणपूल सुरु करण्याची मागणी
चुनाभट्टी ते बीकेसी उड्डाणपूल लवकरात लवकर सुरु करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार नवाब मलिक (Nawab malik protest for chunabhatti to bkc bridge) यांनी केली.
मुंबई : चुनाभट्टी ते बीकेसी उड्डाणपूल लवकरात लवकर सुरु करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार नवाब मलिक (Nawab malik protest for chunabhatti to bkc bridge) यांनी केली. नवाब मलिक यांनी आज (27 ऑक्टोबर) शेकडो कार्यकर्त्यांसोबत चुनाभट्टी उड्डाणपुलाजवळ पूल सुरु करण्यासाठी आंदोलन (Nawab malik protest for chunabhatti to bkc bridge) केले. त्यावेळी त्यांनी जेसीबीमध्ये उभं राहून हटके पद्धतीने आंदोलन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
चुनाभट्टी ते बीकेसी या उड्डाणपुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. पण तारीख मिळत नसल्याने पूल रखडत आहे. त्यामुळे स्थानिकांचे आणि प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. आघाडी सरकारच्या काळात या पुलाला मंजुरी मिळाली होती. पण अद्याप पूल सुरु केला नसून प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
“भाजपला लोकांचे काही देणंघेणं नाही. आम्ही या पुलाचे उद्घाटन करुन राहणार. माझ्या कारकिर्दीत या पुलाला मंजुरी मिळाली. पण अद्याप हा पूल सुरु झाला नाही”, असं नवाब मलिक म्हणाले.
येथे मोठ्या प्रमाणात ट्राफिक होते. त्यामुळे ट्राफिक पोलिसांची वाट लागते. एक-एक तास गाड्यांच्या रांगा लागतात. तरी हा पूल सुरु करत नाहीत. मुख्यमंत्र्यांना या पुलाचे श्रेय घेण्यासाठी ते उशीर करत आहेत. पण त्यामुळे लोकांच्या अडचणी वाढत आहे याचे त्यांना काही पडलं नाही, असंही मलिक म्हणाले.
यावेळी मलिक यांनी जेसीबीवर उभं राहून भाषण केले. तसेच त्यांनी पोलीस प्रशासन यांच्याशीही जेसीबीवर उभं राहून चर्चा केली. जेसीबीवर नवाब मलिक यांच्यासह अनेक कार्यकर्ते होते.
दरम्यान, राष्ट्रवादीतर्फे आज पूल उद्घाटन आंदोलन करण्यात येणार असल्याने काल (26 ऑक्टोबर) रात्रीपासून येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
पूर्व द्रुतगती मार्गावरुन थेट बीकेसीला जाण्यासाठी नवा पूल बांधण्यात आला आहे. या पुलावरुन फक्त 15 मिनिटात बीकेसी गाठता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे बराच वेळ वाचणार आहे. पण अद्याप हा पूल सुरु करण्यात आला नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी दिसत आहे.